Maharashtra Bandh : कोल्हापूरात अवघा मराठा रस्त्यावर : भगव्याची लाट, पाळला अभूतपूर्व अन् कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 04:51 PM2018-08-09T16:51:29+5:302018-08-09T16:57:15+5:30

कडकडीत बंद कसा असावा याचा इतिहासात एक मानदंड ठरावा असा कोल्हापूरकरांनी गुरुवारी अभूतपूर्व बंद पाळला. नोकरी आणि शिक्षणात आरक्षण मिळालेच पाहिजे या मागणीसाठी अवघा मराठा बंदच्या निमित्ताने रस्त्यावर उतरल्याने शहरातील सगळे रस्ते भगव्या जनसागराच्या गर्दीने फुलून गेले.

Maharashtra Bandh: On the Maratha road in Kolhapur: Saffron wave, pavilion closed unprecedented and sterile | Maharashtra Bandh : कोल्हापूरात अवघा मराठा रस्त्यावर : भगव्याची लाट, पाळला अभूतपूर्व अन् कडकडीत बंद

Maharashtra Bandh : कोल्हापूरात अवघा मराठा रस्त्यावर : भगव्याची लाट, पाळला अभूतपूर्व अन् कडकडीत बंद

googlenewsNext
ठळक मुद्देअवघा मराठा रस्त्यावर : भगव्याची लाटआरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही : निर्धार

कोल्हापूर : कडकडीत बंद कसा असावा याचा इतिहासात एक मानदंड ठरावा असा कोल्हापूरकरांनी गुरुवारी अभूतपूर्व बंद पाळला. नोकरी आणि शिक्षणात आरक्षण मिळालेच पाहिजे या मागणीसाठी अवघा मराठा बंदच्या निमित्ताने रस्त्यावर उतरल्याने शहरातील सगळे रस्ते भगव्या जनसागराच्या गर्दीने फुलून गेले.

बंदच्या काळात शहरात एकही दुकान उघडले नाहीच शिवाय साधी चहाची टपरीही कुठे दिसून आली नाही. रॅलीसाठी वापरल्या गेलेल्या दुचाकी वगळता एकही वाहन रस्त्यावर पहायला मिळाले नाही. गल्ली बोळातून, चौकाचौकातून, प्रमुख्य रस्त्यावरुन हातात भगवे ध्वज घेऊन ‘आरक्षण आमच्या हक्काचे’अशा घोषणा देत फिरणारे मराठा समाजातील तरुण असेच चित्र संपूर्ण शहरभर पहायला मिळाले.

कोल्हापूर शहरात गेल्या अनेक दिवसापासून मराठा समाजाच्या आरक्षक्षण मागणीसाठी ठिय्या आंदोलन सुरु आहे. त्यामुळे शहरासह जिल्ह्याच्या ग्रामिण भागातील समाजही या आंदोलनात सहभागी झाला आहे. आंदोलनाचाच एक भाग म्हणून सकल मराठा क्रांती मोर्चाने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या बंदला कोल्हापुरात अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. बंद कसा असू शकतो याचा एक परिपाठही आजच्या बंदने लिहिला गेला. एरव्ही अर्धी अधिक दुकाने सुरु असतात. मात्र गुरुवारी एकाही दुकानाचा दरवाजा उघडला नाही.

गुरुवारी पूर्वनियोजित बंद असल्याने सकाळी कोणीही दुकानदार आपल्या दुकानाकडे फिरकले नाही. उद्योजक, व्यापारी, व्यावसायिक, रिक्षा चालक यांनी आधीच बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे संपूर्ण शहराची चाकं बंद झाली. शहरातील सर्व महाविद्यालये, शाळा बंद राहिल्या. त्यांचे दरवाजेही उघडले गेले नाहीत. मध्यवर्ती बस स्थानक, रंकाळवेश बस स्थानक पूर्णपणे बंद ठेवले होते. एस.टी. व केएमटीची एकही बस वर्कशॉपमधून बाहेर पडली नाही. बस स्थानकाच्या परिसरात शुकशुकाट होता.

विशेष म्हणजे एसटी बसस्थानकांचे मुख्य दरवाजेच बंद ठेवले होते. शहरात दररोज सुमारे सात ते आठ हजार रिक्षा धावत असतात, पण गुरुवारी मात्र एकही रिक्षा रस्त्यावर न आणता रिक्षा सेवा बंद ठेवणेच रिक्षा मालकांनी पसंत केले. त्यामुळे वाहतुकीची सर्वच मार्ग आपोआप बंद झाले. चित्रपटगृहे, मल्टीप्लेक्स सिनेमागृहे, हॉटेल्स, उपहारगृहे बंद राहिले.

शहरातील सर्व प्रमुख व्यापारी पेठा, भाजी मंडई, मार्केट यार्ड, लक्ष्मीपुरीतील धान्य बाजार, मॉल, पेट्रोल पंप बंद राहिले. बाजार समितीत गुरुवारी कमी प्रमाणात भाजीपाल्याची आवक झाली पण त्याचीही विक्री झाली नसल्याने हा माल तेथेच पडून राहिला. शहरात केवळ औषध दुकाने व रुग्णालये वगळता एकाही दुकानाचा दरवाजा अथवा शटर उघडले गेले नाही. अत्यंत कडकडीत बंद पाळला गेला. विशेष म्हणजे कुठेही कसलाही अनुचित प्रकार घडला नाही.
 

सर्वाधिक संख्येने तरुण रस्त्यावर

मराठा समाजातील तरुणांमध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाबाबतीत मोठा आक्रोश आहे. नोकरी नसल्याने त्यांच्यात सरकार विरुध्द तीव्र असंतोष आहे. हा आक्रोश आणि असंतोष गुरुवारी रस्त्यावर पहायला मिळाला. आजच्या बंदमध्ये तरुणांनी मोठ्या संख्यने भाग घेतला. डोकीवर भगवी टोपी, हातात भगवा ध्वज आणि ‘आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे’ अशा घोषणा देत तरुण दसरा चौकाकडे जात होते. त्यापाठोपाठ तरुणांची संख्याही लक्षणिय होती. अनेक तरुणांनी भगवे, काळे, पिवळे अशा रंगाचे टी शर्ट देखिल परिधान केले होते.

रॅलींमुळे दणाणले शहर

अवघा मराठा समाज गुरुवारी रस्त्यावर उतरला होता. ऐतिहासिक दसरा चौकात सभेला येण्याचे आवाहन सकल मराठा समाजातर्फे करण्यात आले होते. परंतु त्याठिकाणी सर्वांना एकत्र येणे अशक्य होते. त्यामुळे पोलिसांनी चहूबाजूंनी दसरा चौकाकडे जाणारे रस्ते तीन टप्प्यात बॅरिकेटस् टाकून रोखले होते. सदरा चौक गर्दीने फुलून गेल्याने हजारो तरुणांना तिकडे जाता आले नाही. त्यामुळे १००-२०० तरुणांचे जत्थे तयार व्हायला लागले. या जत्थांनी मग मोटार सायकल रॅली काढण्यास सुरुवात केली. अनेक तरुणांनी आपापल्या भागातूनच मोटारसायकल रॅली काढली.

या रॅलीज व्हीनस कॉर्नर, फोर्ड कॉर्नर, लक्ष्मीपुरी, बिंदू चौक, शिवाजी पुतळा, मिरजकर तिकटी, महाद्वार, गंगावेश, रंकाळवेश, पापाची तिकटी, माळकर तिकटी, राजारामपुरी, शाहूपुरी या भागातून फिरायला लागल्या. सालेन्सर काढलेल्या दुचाकी, हवेत भिरभिरणारे भगवे ध्वज आणि ‘जय भवानी - जय शिवाजी, मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे’ अशा घोषणांनी अवघे शहर दणाणून गेले. सकाळी साडे अकरा ते दुपारी अडीच या वेळेत तर गल्लीबोळात, चौकाचौकात, प्रमुख रस्त्यांवर या रॅलीच पहायला मिळत होत्या. जेवढे लोक दसरा चौक परिसरात होते,त्यापेक्षा किती तरी लोक अशा रॅलीतून सहभागी झाले होते.

बॅँकाच्या शाखा सक्तीने पाडल्या बंद

राजारामपुरी परिसरातील सर्व गल्ल्यातील व्यापार पेठीतील कापड दुकाने, हॉटेल बंद होती. परंतु राष्ट्रीयकृत तसेच खासगी बॅँकांची कार्यालये, विमा कंपन्यांची कार्यालये, वित्तीय कंपन्यांची कार्यालये नेहमीप्रमाणे सुरु होती. ही माहिती शिवसेना शहर प्रमुख दुर्गेश लिंग्रज, कमलाकर जगदाळे यांना समजताच त्यांनी दोनशे तरुणांना सोबत घेऊन मोटारसायकल रॅली काढली. बॅँकांच्या कार्यालयात घुसून कर्मचारी व अधिकाऱ्यांना दमबाजी करत कामकाज बंद ठेऊन शटर बंद ठेवण्याच्या सक्त सुचना दिल्या. एवढेच नाही तर कामकाज करत बसलेल्या सर्व कर्मचाऱ्यांनाही आतून बाहेर काढले आणि घरी जायला सांगितले. आयसीआयसीआय, स्टेट बॅँक आॅफ इंडिया, कॉसमॉस, युनियन बॅँक, कॅनरा बॅँक,एक्सीस बॅँक, जीपी पारसिक बॅँक आदी बॅँकाच्या शाखा सक्तीने बंद पाडल्या गेल्या.

 

Web Title: Maharashtra Bandh: On the Maratha road in Kolhapur: Saffron wave, pavilion closed unprecedented and sterile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.