Maharashtra Bandh : कोल्हापूर विभागातील एकही एस.टी. रस्त्यांवर धावली नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 06:25 PM2018-08-09T18:25:47+5:302018-08-09T18:31:14+5:30
मराठा क्रांती ठोक मोर्चाच्यावतीने पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’मुळे राज्य परिवहन महामंडळातील कोल्हापूर विभागातील एकही एस.टी. गुरुवारी रस्त्यावर धावली नाही. एस.टी.च्या इतिहासामध्ये प्रथमच आंदोलन काळात एस.टीची वाहतूक पूर्णपणे बंद होती. यासह रिक्षा, केएमटी या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही पूर्णपणे ठप्प होती.
कोल्हापूर : मराठा क्रांती ठोक मोर्चाच्यावतीने पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’मुळे राज्य परिवहन महामंडळातील कोल्हापूर विभागातील एकही एस.टी. गुरुवारी रस्त्यावर धावली नाही. एस.टी.च्या इतिहासामध्ये प्रथमच आंदोलन काळात एस.टीची वाहतूक पूर्णपणे बंद होती. यासह रिक्षा, केएमटी या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही पूर्णपणे ठप्प होती.
कोणत्याही ‘बंद’ काळात मुख्यकरून एस.टी.ची तोडफोड व जाळपोळ केली जाते. त्यामुळे एस.टी.चे मोठे नुकसान होते. त्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव महामंडळाच्यावतीने कोल्हापूर विभागातील सर्व वाहतूक रात्री बारानंतर पूर्णपणे बंद ठेवत प्रत्येक आगारात गाडी लावण्याबाबत चालक - वाहकांना सूचना देण्यात आल्या होत्या.
गुरुवारी दिवसभर सुरक्षिततेच्या कारणास्तव बसस्थानक व विभागीय कार्यालयाचे प्रवेशद्वार बंद ठेवले. ‘बंद’ची माहिती अनेकांना असल्याने प्रवाशी वर्गाने गुरुवारी प्रवास करणे टाळल्याने नेहमी गजबजलेले मध्यवर्ती बसस्थानक, तसेच संभाजीनगर व रंकाळा बसस्थानकांवर दिवसभर शुकशुकाट होता.|
रिक्षाचालकांनी स्वत:हून ‘बंद’मध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यामुळे सांयकाळपर्यंत एकही रिक्षा रस्त्यावर नव्हती; त्यामुळे लक्ष्मीपुरी, राजारामपुरी येथील प्रमुख व्यापारी पेठा, महाद्वार रोड, मिरजकर तिकटी, पापाची तिकटी, शिवाजी रोड, ताराबाई रोड, रंकाळावेश, बिंदू चौक, राजारामपुरी मुख्य रस्ता, स्टेशन रोड, व्हीनस कॉर्नर, रेल्वे स्टेशन, बसस्थानक परिसरातील रिक्षा स्टॉप मोकळे पडले होते. ‘के.एम.टी.’ने ‘बंद’मध्ये सहभागी सर्व बससेवा बंद ठेवली होती.
९३४ एस.टीं.ना ब्रेक
राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागातील सर्व आगारांतील ९३४ गाड्यांची वाहतूक पूर्ण बंद असल्याने विभागाचे सुमारे ७५ लाखांचे उत्पन्न बुडाले, तर दोन लाख ६० हजार किलोमीटर वाहतूक रद्द करण्यात आली.
पर्यंटकांचे हाल
रेल्वेने कोल्हापुरात आलेले काही पर्यटक व देवदर्शनासाठी आलेल्या नागरिकांना मात्र, एस.टी., रिक्षा व के.एम.टी. बंदचा फटका बसला. त्याना नियोजितस्थळी जाण्यासाठी पायपीट करतच जावे लागेल.
रेल्वेची वाहतूक सुरळीत
रेल्वेची वाहतूक सुरळीत झाली. मात्र, प्रवाशी संख्या कमी होती. सुरक्षिततेच्या कारणास्तव मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला.