Maharashtra Budget 2022: अंबाबाई मंदिराच्या विकासासाठी २५ कोटी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2022 11:05 AM2022-03-12T11:05:47+5:302022-03-12T11:06:29+5:30
ऐतिहासिक शाहू मिलच्या जागेत उभा करण्यात येणाऱ्या नियोजित स्मारकास आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणा शुक्रवारी वित्तमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना विधानसभेत केली.
कोल्हापूर : महाराष्ट्राचे श्रध्दास्थान असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर विकास आराखड्यातील कामे पूर्णत्वाकडे नेण्याकरिता राज्याच्या अंदाजपत्रकात २५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय ऐतिहासिक शाहू मिलच्या जागेत उभा करण्यात येणाऱ्या नियोजित स्मारकास आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणा शुक्रवारी वित्तमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना विधानसभेत केली.
राज्याच्या अर्थसंकल्पात कोल्हापुरातील कोणत्या विकास कामांना निधी मिळणार, याबाबत उत्सुकता लागून राहिली होती. कोल्हापूरकरांसाठी चार महत्त्वाच्या कामांसाठी निधी देण्याचे आश्वासन वित्तमंत्री पवार यांनी दिले आहे. त्यामध्ये अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखड्यासाठी २५ कोटी, शाहू मिलच्या जागेवर उभारण्यात येणाऱ्या नियोजित स्मारकास आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. यासंदर्भातील आराखड्याचे सादरीकरण झाले आहे.
कोल्हापुरातील शासकीय रुग्णालयात महिला व लहान मुलांवरील उपचारासाठी शंभर खाटांचे महिला व नवजात शिशू रुग्णालय उभारण्याचा, तसेच शिवाजी विद्यापीठात महापुरुषांचे अध्यासन केंद्र उभारण्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णयही राज्य सरकारने घेतला आहे. याशिवाय राजर्षी शाहू महाराज यांचे जन्मगाव असलेल्या कागल शहरातील नगरपालिकेच्या शाळांचा शैक्षणिक दर्जा व गुणवत्ता सुधारण्याकरिता एक कोटीचा निधी दिला जाणार आहे.
कृतज्ञता पर्व साजरे होणार
राजर्षी शाहू महाराज यांची १०० वी पुण्यतिथी ६ मे २०२२ रोजी आहे. त्याचे औचित्य साधून राज्यभर नवीन आर्थिक वर्ष हे ‘कृतज्ञता पर्व’ म्हणून साजरे केले जाणार आहे. तसेच वर्षभर राज्यात सगळीकडे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. राजर्षींच्या १०० व्या पुण्यतिथीनिमित्ताने त्यांचे शाहू मिलच्या जागेत स्मारक उभारले जाणार आहे.
भक्तनिवाससह अन्य सुविधा निर्माण करणार
अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखडा हा एकूण ७९.९६ कोटी रुपयांचा असून, त्यातील पहिल्या टप्प्यात दर्शनमंडपासाठी म्हणून सात कोटी मंजूर करण्यात आले होते. परंतु दर्शन मंडपाची जागा निश्चित करण्यात अडचणी येऊ लागल्याने हा निधी सरस्वती चित्रमंदिर परिसरातील जागेवर बहुमजली पार्किंग उभारण्याकडे वळविण्यात आला. त्याचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. बहुमजली पार्किंगसाठी आधीचे सात कोटी आणि नंतर एक कोटी २० लाख असे मिळून आठ कोटी २० लाखांचा निधी यापूर्वीच मिळाला आहे.
१८ कोटींचा निधी भक्तनिवासासाठी
आता नवीन वर्षात मिळणाऱ्या २५ कोटींच्या निधीतून कोणती कामे करायची, याचा प्राधान्यक्रम महानगरपालिका प्रशासनाने पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासमोर झालेल्या सादरीकरणानंतर निश्चित केला आहे. सध्या ज्या ठिकाणी बहुमजली पार्किंगची इमारत उभारली जात आहे, त्याच्यामध्ये बेसमेंट, ग्राऊंड फ्लाेअर तसेच त्यावरील दोन मजल्यावर पार्किंगसह दुकानदारांचे पुनर्वसन केले जाणार आहे. त्यानंतर पाचवा, सहावा, सातवा व आठवा मजला भक्तनिवास बांधले जाणार आहे.
गाडीअड्ड्यातील जागेवर भक्तनिवास अशक्य
या आधी भक्त निवास व्हीनस कॉर्नरजवळील गाडीअड्ड्याच्या जागेवर उभारले जाणार होते. परंतु ही जागा आता पूररेषेत येत असल्याने तेथे बांधकाम करता येणार नाही. म्हणून पालिका प्रशासनाने पालकमंत्री पाटील यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर पार्किंगच्या इमारतीत करण्याचे ठरले आहे. त्यादृष्टीने बहुमजली पार्किंगच्या इमारतीचे फौंडेशन, स्ट्रक्चर निर्माण केले आहे.
अंबाबाई मंदिर विकास कामांचा प्राधान्यक्रम
- दर्शन मंडप इमारत बांधणे - ६.१८ कोटी
- व्हीनस कॉर्नर भक्त निवास बांधणे - ४५.९६ कोटी
- सरस्वती टॉकीज बहुमजली पार्किंग - ९.८५ कोटी
- बिंदू चौक बहुमजली पार्किंग इमारत बांधणे - ८.९८ कोटी
- सार्वजनिक स्वच्छतागृहे बांधणे - २.२९
- वाहतूक व्यवस्थेसाठी बसथांबे निर्माण करणे - २.४० कोटी
- पादचारी मार्ग बांधणे - १.३२ कोटी
- दिशादर्शक फलक बसविणे - १५ लाख
- पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे - ११ लाख
- अग्निशमन व्यवस्था -१.६९ कोटी
- सुरक्षा व्यवस्था - ९२ लाख
- आरोग्य व्यवस्था - ११ लाख
आठवड्यापूर्वीच अंबाबाई मंदिर परिसरात झालेल्या कार्यक्रमात, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करून ५०० कोटींचा विकास आराखडा मंजूर करून आणू. या अर्थसंकल्पात २५ कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. हा कोल्हापूर जिल्ह्यासाठी अत्यंत चांगला अर्थसंकल्प आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सबंध शेतकऱ्यांसाठी, समाजातील सर्व घटकांसाठी हा अतिशय चांगला अर्थसंकल्प आहे. - हसन मुश्रीफ, ग्रामविकास मंत्री
समाजाच्या सर्व घटकांना न्याय देणारा अर्थसंकल्प आहे. त्याबरोबर राज्याचा सर्व भागातील महत्त्वाच्या विषयांसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. आरोग्यसेवा, दळणवळण सुविधा, यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी दिला आहे. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून ५० हजार देऊन या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने पाठबळ दिले आहे. महालक्ष्मी मंदिर विकास आराखडा पुढील टप्प्यासाठी २५ कोटी, तसेच शिवाजी विद्यापीठ आधुनिकीकरणासाठी १० कोटी, शाहूमिल येथील राजर्षी शाहू महाराज स्मारकासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय अभिनंदनीय आहे. - सतेज पाटील, पालकमंत्री