दलबदलूंना पाडण्याचे महाराष्ट्राला आवाहन : एन. डी. पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2019 12:38 AM2019-09-08T00:38:05+5:302019-09-08T00:38:09+5:30

विश्वास पाटील। लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : गेली पाच-२५ वर्षे एका पक्षाकडून सगळे सत्तेचे लाभ भोगल्यानंतर आता पक्षांतर करण्याची ...

Maharashtra calls for demolition of defectors: N. D. Patil | दलबदलूंना पाडण्याचे महाराष्ट्राला आवाहन : एन. डी. पाटील

दलबदलूंना पाडण्याचे महाराष्ट्राला आवाहन : एन. डी. पाटील

googlenewsNext

विश्वास पाटील।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : गेली पाच-२५ वर्षे एका पक्षाकडून सगळे सत्तेचे लाभ भोगल्यानंतर आता पक्षांतर करण्याची महाराष्ट्रात लाट आली असून, त्यामागे निव्वळ राजकीय स्वार्थ आहे; त्यामुळे महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनतेला माझे आवाहन आहे, की त्यांनी अशा दलबदलू लोकांना या निवडणुकीत पाडा. आईला आई व बापाला बाप न म्हणणाऱ्यांची ही औलाद आहे, अशा अत्यंत तिखट शब्दांत त्यांनी या लोकांचा समाचार घेतला आहे. हल्ली माझी प्रकृती चांगली झाली आहे; त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत मी असे पक्षांतर करून निवडणूक लढविणाऱ्यांविरोधात प्रचारासाठी महाराष्ट्रात फिरणार असल्याचेही ज्येष्ठ विचारवंत प्रा. एन. डी. पाटील यांनी सांगितले.
महाराष्ट्रात सध्या पक्षांतराचा सिझन
सुरू आहे, त्याकडे आपण कसे
पाहता.?
बोट बुडायला लागली म्हणजे उंदरे प्रथम उड्या मारायला लागतात. त्या प्रवृत्तीचे हे लोक आहेत. सगळीकडे चला रे चला..पळा रे पळा.. असाच माहौल आहे. ज्या पक्षाने तुम्हाला मानसन्मान दिला, काम करण्याची संधी दिली, तुम्ही कोणच नव्हता, तेव्हा ओळख दिली. केवळ स्वार्थासाठी त्या पक्षाला सोडचिठ्ठी देणे ही संतापजनक गोष्ट आहे. त्यातून राजकीय निष्ठा धुळीला मिळत आहेत. ज्या शिडीने तुम्ही राजकारणात एकेक पायरी चढला. सत्ता भोगली, पदे लाटली, त्याच पक्षाची शिडी ढकलून राजकारणात सत्तेच्या पायी लोटांगण घालणाºयांची संख्या बेसुमार वाढते आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत तुमच्या माझ्यासह सर्वसामान्य जनतेचीच खरी कसोटी आहे. मीठानेच आपला खारटपणा सोडला तर या जगात अशी कोणती गोष्ट आहे, की ती खारटपणाची जागा घेईल. त्यामुळे लोकांच्याच हातात या प्रवृत्तीला ताळ्यावर आणण्याचे शस्त्र आहे. पक्ष कोणताही असो ज्यांनी ज्यांनी दलबदलूपणा केला आहे, त्यांना घरी बसवूया आणि अद्दल घडवूया.
पक्ष वाढविण्यासाठी विरोधी
पक्षांतील नेत्यांना स्वपक्षात घेतले तर
त्यात गैर काय?
लोकशाहीत बहुमत मिळविणे यात गैर काही नाही. महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षाला पुरेसे बहुमत मिळालेले आहे; परंतु भाजप-शिवसेनेचे सध्याचे जे राजकारण सुरू आहे, ते तेवढ्यापुरते मर्यादित नाही. त्यांना विरोधी पक्षच नक ो आहे. त्यांना विरोधक संपवायचेच आहेत. विरोधक संपविणे हीच तुमच्या लोकशाहीची पूर्वअट आहे का? ज्या पक्षांतून हे लोक तुमच्याकडे आले, त्या पक्षांनी काही चुका जरुर केल्या असतील; परंतु त्याचा हिशेब मांडण्याची ही वेळ नाही. तुम्हाला नुसते बहुमत नको आहे, तरी विरोधी पक्षही नको आहे. काहीतरी मिळेल म्हणून घूस कशी जमीन उकरते, तिला सगळीकडे सोनेच दिसते, तशा अधाशापणाने सद्या फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. आम्ही करू तोच कारभार स्वच्छ. आम्ही करू तोच निर्णय योग्य. आम्हाला कुणी प्रश्न विचारलेले चालणार नाही. नव्हे प्रश्न विचारण्यासाठी, कामकाजावर बोट ठेवण्यासाठी, काही चुका झाल्या,
तर वाभाडे काढण्यासाठीसुद्धा आम्ही
विरोधक ठेवणार नाही, असाच हा
सगळा प्रयत्न आहे. शेवटचा माणूससुद्धा काढून घेण्याची भूमिका लोकशाहीच्या मुळावर उठणारी आहे. विरोधी पक्षाची ताकद ही एक तरफ आहे, तिने कसलेही वजन उचलते.
या पक्षांतराबद्दल लोकांतून काही
प्रतिक्रिया उमटत नाहीत, म्हणजे त्यांना
ते मान्य आहे असे समजावे का?
नाही, कधीच नाही. सामान्य माणसाला या सर्व गोष्टींबद्दल कमालीचा तिरस्कार आहे; परंतु तोच स्वत:च्या प्रश्नात इतका विविध प्रश्नाने गांजला आहे, की त्याला आजच्या घडीला या दलबदलू वर्तनाबद्दल काही भाष्य करायला वेळ नाही. त्याला नक्की या साºया गोष्टींची शिसारी आहे; त्यामुळे तोच या दलबदलूंचे मनसुबे उलटेपालटे करणार आहे. आपण काल होतो तिथेच बरे होतो, असे म्हणायची पाळी त्यांच्यावर येईल. हेच त्यांच्या नशिबात लिहून ठेवले आहे; परंतु आज त्याबद्दल बोलणे बरोबर नाही.
हे सगळे रोखायचे कसे,
असे तुम्हाला वाटते?
लोकशाहीत पंतप्रधान किंवा राष्ट्रपती कधीच सार्वभौम असत नाही. सार्वभौम असते ती सामान्य जनता. या देशात हातात शस्त्र घ्यायला बंदी आहे; परंतु मतदान करण्याचा अधिकार आहे. सरकारला जाब विचारण्याचा अधिकार आहे तोपर्यंत राज्यकर्त्यांना निवांत झोप लागणार नाही. आम्हाला वाटते तसेच सारे घडेल, असे मी म्हणत नाही. आम्ही म्हणतो त्याप्रमाणे लोकांनी मतदान केले नाही, तर त्यांना दोषही देणार नाही; कारण सामान्य माणसावर अनेक प्रकारचे दबाव असतात. त्याच्या मनात सुप्तावस्थेत ही ताकद असते. राज्यकर्ते बंदुकधारी झाले तरी जनताच सार्वभौम असते. जमावबंदी करण्यासाठी १४४ कलम लावता येते; परंतु जेव्हा महासागराच्या लाटा येतात त्याला जमावबंदीचे कलम लागू होत नाही, या सत्यावर आधारित आमचा दावा आहे, यापेक्षा या विषयांवर अधिक बोलले पाहिजे, असे आम्हाला वाटत नाही.

Web Title: Maharashtra calls for demolition of defectors: N. D. Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.