गद्दार आणि खोटारड्यांवर महाराष्ट्र विश्वास ठेवू शकत नाही म्हणून ही रडारड, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2024 08:19 AM2024-02-18T08:19:58+5:302024-02-18T08:39:31+5:30
Aditya Thackeray Criticize Eknath Shinde: ठाकरे गटाचे नेते आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या या भावूक भाषणावर घणाघाती टीका केली आहे. गद्दार आणि खोटारड्यांवर महाराष्ट्र विश्वास ठेवू शकत नाही त्यामुळे ही रडारड चालली आहे असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे.
शिवसेनेच्या कोल्हापूर येथे झालेल्या महाअधिवेशनामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी भावूक भाषण केले होते. मी एक बाप आणि नवरा म्हणून अपयशी ठरलो, असे ते म्हणाले होते. दरम्यान, ठाकरे गटाचे नेते आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या या भावूक भाषणावर घणाघाती टीका केली आहे. गद्दार आणि खोटारड्यांवर महाराष्ट्र विश्वास ठेवू शकत नाही त्यामुळे ही रडारड चालली आहे असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे.
एकनाथ शिंदे यांच्या भावूक भाषणावर प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे म्हणाले की, गद्दार आणि खोटारड्यांवर महाराष्ट्र विश्वास ठेवू शकत नाही. त्यामुळेच ही सगळी रडारड चालली आहे. खोटं बोलायचं हे त्यांचं धोरण आहे. त्यांच्याकडे कुणीही लक्ष देणार नाही. ज्यांनी त्यांना घडवलं, त्यांना मंत्रिपद दिलं, सगळं काही दिलं. त्यांच्याच पाठीत जो माणून खंजीर खुपसू शकतो, ते किती काळ्या मनाचे आहेत आणि त्यांच्यावर किती विश्वास ठेवायचा हे तुम्ही ठरवा, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला.
दरम्यान, मुंबईत झालेल्या सभेमधूनही आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि शिंदे गटावर टीका केली होती. ते म्हणाले की, 'गद्दारांनी आता सुद्धा काहीतरी रडारड केली आहे. पण तुमच्यावर असलेला गद्दार आणि बापचोर हा टॅग कधीच पुसली जाणार नाही. महाराष्ट्रातले प्रकल्प गुजरातमध्ये पळवले जाताहेत. मुंबईच्या रक्ता रक्तात क्रिकेट असताना वर्ल्डकप फायनल कुठे झाली तर गुजरातला झाली. जर तो सामना मुंबईत झाली असती तर वेगळा निकाल लागला असता, असेही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.
यावेळी केंद्रीय तपास यंत्रणांकडून होत असलेल्या कारवाईवरही आधित्य ठाकरे यांनी टीका केली. ते म्हणाले की, आज या गद्दारांविरोधात किशोरी पेडणेकर, राजन साळवी, सूरज चव्हाण लढत आहेत. संजय राऊत तर तुरुंगात जाऊन आले आहेत, आता तर ते कोणाला घाबरत नाही आहेत. दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी केंद्रीय संस्थांचा वापर केला जातोय. उद्या तुमच्या घरीसुद्धा ईडी, सीबीआय घेऊन येतील, पण आपण घाबरायच नाही. आपण एक होऊन मुंबईकर होऊन लढायचं आहे, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.