Maharashtra Election 2019 : पवार, तुम्ही पाटलांना ओळखलं नाही : चंद्रकांत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2019 04:12 AM2019-10-12T04:12:58+5:302019-10-12T04:15:04+5:30
‘कोल्हापूर उत्तर’मधील शिवसेनेचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ आयोजित मेळाव्यात चंद्रकांत पाटील बोलत होते.
कोल्हापूर : ‘शरद पवार, तुम्ही पाटलांना ओळखलं नाही. चेहऱ्यावर कोणताही भाव न आणता कसा फटका लगावतो, हे समजतही नाही,’ अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी पवार यांच्यावर हल्लाबोल केला.
‘कोल्हापूर उत्तर’मधील शिवसेनेचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी पाटील यांनी पवारांवर सडकून टीका करीत बंडखोरांनाही इशारा दिला. पाटील यांनी कोथरूडच्या प्रचारातून वेळ काढून कोल्हापूर येथे तीन आणि इचलकरंजीमध्ये सभा घेतल्या.
पाटील म्हणाले, पवार यांना वाटले की, मला कोथरूडमध्ये अडकवून ठेवता येईल; पण तसे होणार नाही, असे सांगून पाटील यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये युतीधर्म पाळावाच लागेल, असे निक्षून सांगितले. मी निवडणूक युद्ध म्हणूनच लढतो. त्यामुळे कोथरूडमध्ये शेवटचे मत पडेपर्यंत मी थांबणार आहे. उच्चांकी मतदार घेऊन दाखवू. एकीकडे ‘पवार यांचं वय झालंय,’ असे सुशीलकुमार शिंदे सांगत आहेत. दुसरीकडे, मरणप्राय झालेल्या कॉँग्रेसमध्ये आता प्राणवायू फुंकू नका असेही पाटील म्हणाले.
राष्ट्रवादी महिला आणि ‘स्वाभिमानी’चे जिल्हाध्यक्ष भाजपमध्ये बूथप्रमुखांच्या मेळाव्यात माजी खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, महिला राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष संगीता खाडे आणि कॉँग्रेसच्या उमेदवारीच्या स्पर्धेत असलेले दौलत देसाई यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. काटे यांच्या जाण्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेला महिनाभराच्या अंतरात दुसरा मोठा धक्का बसला आहे.
...तर बायकोच्या विरोधातही प्रचार!
विरोधी पक्षातून माझी बायको जरी उभारली तरी तिचा प्रचार माझ्याकडून होणार नाही. सकाळी एकत्र चहा घेऊन बाहेर पडू; पण नंतर मात्र दिवसभरात काय झाले याची विचारणाही तिच्याकडे करणार नाही, अशा शब्दांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना डोस दिला.