आमचं काय चुकलं, जनतेनं सांगावं; चंद्रकांत पाटलांचा कोल्हापूरकरांना सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2019 03:40 PM2019-10-27T15:40:45+5:302019-10-27T16:32:27+5:30
चंद्रकांत पाटलांनी भाजपा मुक्त कोल्हापूरचे खापर शिवसेनेवर फोडले.
कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीत भाजपाला बहुमत मिळाले आहे. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यात भाजपाचा सुपडासाफ झाला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरुड मतदारसंघातील नवनिर्वाचित आमदार चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत कोल्हापूरमधील जनतेलाच प्रश्न विचारले आहेत.
कोल्हापूरात आम्ही चांगली कामे केली आहेत. कोल्हापूरात विमानसेवा आम्ही सुरु केली. ज्यांनी दहा वर्षे विमानसेवा बंद ठेवली, त्यांनाच तुम्ही विजयी केला. ज्यांनी कोल्हापूर बकाल केले, त्यांना तुम्ही निवडून दिले, असे सवाल चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरातील जनतेला केले आहेत.
याशिवाय, कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील पराभवाचे खापर चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर फोडले आहे. शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांनी आधीपासूनच भाजपाच्या विरोधात भूमिका घेतली होती. त्यांनी काँग्रेसचे नेते बंटी पाटील यांनी आपल्याला खासदार केले आहे, त्यांचे मला ऋण भेडायचे आहे, असे उघडपणे जाहीर करत काँग्रेसला पाठिंबा दिल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. तसेच, मंडलिकांनी याला पाड त्याला पाड या आपल्या मूळ संस्काराप्रमाणे राजकारण केले. ते आपल्या सोयीचे राजकारण करीत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील मूळ शिवसैनिकांनी या मंडलिक प्रवृत्तीचा विचार करावा, असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केले.
गेल्या निवडणुकांमध्ये भाजपाने चांगली मुसंडी मारली होती. मात्र, या निवडणुकीत आम्ही कुठे कमी पडलो, याबाबत चिंतन करणार आहोत. जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. परंतू आमचे काय चुकले, ते जनतेने सुद्धा सांगावे, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरकरांना केला आहे.