महाराष्ट्र, कलबुर्गी एक्स्प्रेसची २६ जानेवारीला ‘विद्युत’ चाचणी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 12:41 PM2023-01-10T12:41:42+5:302023-01-10T12:42:13+5:30
सध्या महालक्ष्मी एक्स्प्रेस, कोल्हापूर-तिरूपती आणि कोयना एक्स्प्रेस विजेवर धावत आहेत
कोल्हापूर : महाराष्ट्र एक्स्प्रेस आणि कलबुर्गी सुपरफास्ट एक्स्प्रेस आता विजेवर चालविण्याची तयारी मध्य रेल्वे विभागाकडून सुरू झाली आहे. या दोन्ही रेल्वेंची विद्युत चाचणी दि. २६ आणि २७ जानेवारीला घेण्यात येणार आहे.
सध्या महालक्ष्मी एक्स्प्रेस, कोल्हापूर-तिरूपती आणि कोयना एक्स्प्रेस विजेवर धावत आहेत. रोज दुपारी पावणेतीनची महाराष्ट्र एक्स्प्रेस आणि दुपारी तीन वाजता सुटणारी कोल्हापूर-कलबुर्गी सुपरफास्ट एक्स्प्रेस विजेवर सुरू करण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून प्रवासी आणि त्यांच्या संघटनांकडून सुरू आहे.
त्याची दखल घेत रेल्वे विभागाने महाराष्ट्र आणि कलबुर्गी एक्स्प्रेसची विद्युत चाचणी घेण्याचे ठरविले आहे. ती पूर्ण झाल्यानंतर या रेल्वे पूर्णपणे विजेवर धावणार आहेत. दरम्यान, आता कोल्हापूर-अहमदाबाद आणि कोल्हापूर-दिल्ली या रेल्वे विजेवर लवकर सुरू कराव्यात, अशी मागणी पुणे विभागीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य शिवनाथ बियाणी यांनी सोमवारी केली.