Maharashtra Floods : तब्बल 7 दिवसांनंतर पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 01:12 PM2019-08-12T13:12:04+5:302019-08-12T14:23:51+5:30
तब्बल सात दिवसानंतर महामार्गावरील वाहतूक सुरू झाली आहे. पाण्याचे टँकर रुग्णवाहिका, पेट्रोल-डिझेल, गॅसचे टँकर, जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करणारी वाहने प्राधान्यांने कोल्हापूर शहरात येत आहेत.
कोल्हापूर - पुणे-बंगळुर महामार्गावर शिरोली सांगली फाटा येथे महामार्गावरील अवजड वाहतूक सोमवारी (12 ऑगस्ट) सकाळी नऊ वाजता सुरू करण्यात आली आहे. महामार्गावर अजूनही दीड फूट पाणी आहे. त्यामुळे लहान प्रवासी गाड्या सुरू करण्यात आल्या नव्हत्या मात्र आता दुपारी बारा वाजता सर्व प्रवासी वाहतूक सुरू झाली आहे. एकाच मार्गावरून कोल्हापूर आणि पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक सुरू झाली आहे. फक्त दुचाकी वाहतूक बंद आहे.
तब्बल सात दिवसानंतर महामार्गावरील वाहतूक सुरू झाली आहे. पाण्याचे टँकर रुग्णवाहिका, पेट्रोल-डिझेल, गॅसचे टँकर, जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करणारी वाहने प्राधान्यांने कोल्हापूर शहरात येत आहेत. बेळगावपर्यंत वाहतूक सुरू असून गरज असेल तरच बाहेर पडा. यामुळे वाहतुकीची कोंडी होणार नाही असं कोल्हापूर पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी म्हटलं आहे.
महापूर, तसेच अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्रात 40 जणांचा मृत्यू झाला असून, त्यापैकी 19 जण सांगली जिल्ह्यातील आहेत. सांगली, कोल्हापूर भागातील तब्बल 200 रस्ते आणि पूल बंद असल्याने मदत पोहोचविण्यात अडचणी येत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रातील पूरस्थितीची हवाई पाहाणी केली. पुरामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला रशिया दौरा रद्द केला आहे.
Maharashtra:Aircraft assets of South Western Air Command continued High Availability Disaster Recovery missions in Kolhapur today by positioning 1700 kgs of specialist life-saving drugs&medicines along with 22 personnel from Army Medical Corps from Pune airbase by 2 Avro aircraft pic.twitter.com/f8OykKm6uC
— ANI (@ANI) August 11, 2019
राज्यातील दहा जिल्ह्यांत पूरपरिस्थिती असून, 70 तालुके व 761 गावे बाधित झाली आहेत. 4,47,695 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. मदतकार्यात एनडीआरफच्या 32, एसडीआरफच्या 3, लष्कराच्या 21, नौदलाच्या 41, तटरक्षक दलाची 16 पथके कार्यरत आहेत. 226 बोटींद्वारे बचावकार्य सुरू आहे. पुरामुळे 40 व्यक्तींचा मृत्यू झाला, तर चारजण जखमी झाले आहेत, तर 48 जनावरे मृत्युमुखी पडल्याची माहिती माहिती राज्य आपत्ती नियंत्रण कक्षातून देण्यात आली आहे.
पाणी ओसरताच या रस्त्यांची डागडुजी, सफाई करून तातडीने वाहतूक पूर्वपदावर आणायला हवी. राज्यभरातून मनुष्यबळ आणि संसाधने मागवा, पण तातडीने ट्रान्सफॉर्मर आदींची दुरूस्ती करून वीज पुरवठा सुरळीत करावीत. पूरग्रस्त भागातील रस्ते वाहतूक आणि वीजपुरवठा पुर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिले.