Maharashtra Floods : महापुरामुळे वारणा काठच्या चार गावातील वैद्यकीय यंत्रणेवर ताण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2019 05:14 PM2019-08-11T17:14:50+5:302019-08-11T17:20:47+5:30
वारणेच्या महापुरामुळे वारणा काठावर पूर बाधित असणाऱ्या निलेवाडी, जुने पारगाव, जुने चावरे व घुणकी येथे वैद्यकीय सेवेसाठी राबणाऱ्या यंत्रणेवर मोठा ताण पडला आहे.
दिलीप चरणे
नवे पारगाव - वारणेच्या महापुरामुळे वारणा काठावर पूर बाधित असणाऱ्या निलेवाडी, जुने पारगाव, जुने चावरे व घुणकी येथे वैद्यकीय सेवेसाठी राबणाऱ्या यंत्रणेवर मोठा ताण पडला आहे. महापूर येण्यापूर्वी व महापूर आल्यानंतरचे तुलना केली असता वैद्यकीय यंत्रणेवर दुप्पट ताण पडला असल्याचे वास्तव समोर येत आहे.
वारणेच्या काठावर असणाऱ्या निलेवाडी, जुने पारगाव, जुने चावरे, घुणकी, किणी व लाटवडे या गावांना वैद्यकीय सेवेसाठी शासकीय वैद्यकीय सेवा पुरवणारी यंत्रणा म्हणून नवे पारगाव ग्रामीण रुग्णालय, अंबप प्राथमिक आरोग्य केंद्र व भादोले प्राथमिक आरोग्य केंद्र यातील माध्यमातून महापूर परिस्थितीत नागरिकांना वैद्यकीय सुविधा पुरवल्या जात आहेत. नवे पारगावच्या ग्रामीण रुग्णालयात महापुरा आधी सरासरी 100 बाह्यरुग्ण तर दहा आंतररुग्ण असायचे आता मात्र महापुरामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ होऊन दोनशेहून अधिक बाह्यरुग्ण तर 25 हून अधिक आंतररुग्ण आहेत. येथे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. बी. एस. लाटवडेकर व डॉ. अंकिता हंकारे व दहा कर्मचारी सेवा बजावत आहेत. विलास शिंदे हे कर्मचारी रुग्णवाहिका चालक असून कर्तव्य बरोबरच केस पेपर काढण्याचे काम ही ते सांभाळत आहेत.
अंबपच्या प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत नऊ गावे असून पैकी निलेवाडी, जुने पारगाव व चावरे ही पूरबाधित गावे आहेत. वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश गायकवाड यांच्या नियोजनाखाली या तीनही गावात वैद्यकीय पथके तयार केली आहेत. दररोज दोनशे रुग्ण बिरदेवनगर पारगाव येथे 85 रुग्ण तर नवे पारगावच्या पाराशर हायस्कूलमध्ये चारशे रुग्णांना वैद्यकीय सेवा दिली जात आहे. वैद्यकीय यंत्रणेवरील वाढता ताण पाहून या पथकामध्ये शालेय विद्यार्थी आरोग्य तपासणी पथकातील तीन वैद्यकीय अधिकारी व तीन कर्मचारी यांचा समावेश केला आहे.
घुणकी, लाटवडे, किणी व भादोले या पूरपीडित गावातील रुग्णांच्या सेवेसाठी भादोले प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून वैद्यकीय सेवा दिली जात आहे. वैदयकिय पथके तयार करुन आरोग्यसेवा तैनात ठेवली असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. माहेश्वरी कुंभार यांनी दिली. त्यांच्यासोबत वैद्यकीय अधिकारी चेतन शिखरे यांच्यासह दहा कर्मचारी कार्यरत आहेत. घुणकी येथील वैद्यकीय पथकाच्या माध्यमातून घुणकीत 633, लाटवडे 200, किणी टोलनाका येथे 160, भादोले 76 बाह्यरुग्ण याना सेवा दिली आहे.
पाऊस थोडा कमी झाल्यामुळे पूरबाधित गावातील काही मार्ग सुरू होत आहेत. पुरानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्याचे खरे आव्हान आता वैद्यकीय सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समोर असणार आहे. गावात कोणत्याही प्रकारची रोगराई - संसर्ग होऊ नये याकरीता पुरवायची औषधे या सगळ्या गोष्टी वैद्यकीय पथकांना महापुरानंतर कराव्या लागणार आहेत.