Maharashtra Floods : पूरग्रस्तांना लागेल ती मदत करू - मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2019 04:25 PM2019-08-08T16:25:12+5:302019-08-08T18:26:05+5:30

'राज्य सरकारकडून पूरग्रस्तांना योग्य मदत केली जाणार'

Maharashtra Floods : We will help those affected by the floods - CM | Maharashtra Floods : पूरग्रस्तांना लागेल ती मदत करू - मुख्यमंत्री

Maharashtra Floods : पूरग्रस्तांना लागेल ती मदत करू - मुख्यमंत्री

Next

कोल्हापूर : कोल्हापुरातील पूरस्थितीचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन पूरग्रस्तांना राज्य सरकारकडून मदतीचे आश्वासन दिले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर, सांगलीमध्ये हवाई पाहणी केली. यावेळी सांगली शहर आणि आसपासची परिस्थिती अतिशय भीषण आहे. जिल्ह्याला सगळीकडे पाण्याने वेढले आहे. तसेच, खराब हवामानामुळे सांगलीचा दौरा रद्द करावा लागला, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

आर्मी, नेव्ही, कोस्टगार्ड, एनडीआरएफ आणि पोलीस यांच्याकडून पूरग्रस्तांची मदत सुरु आहे. पंजाब, ओडिसा, गोवा, गुजरात अशा अनेक ठिकाणाहून बचाव पथके बोलावली आहेत. पुरात अडकलेल्या सर्वांना सुखरुप काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. एअरलिफ्टिंग करण्याचेही प्रयत्न सुरु आहेत. सध्या खासगी, कोस्टगार्ड, नौदल एनडीआरएफच्या एकूण 60 बोटी सध्या कार्यरत असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.  

कोल्हापुरातील 18 गावांना पुराचा वेढा आहे. जिल्ह्यातील 3 हजार 800 घरे पुरामुळे बाधित झाली आहेत, तर 8 हजारांहून अधिक लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. तसेच अद्याप माझ्यापर्यंत चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आली आहे. राज्य सरकारकडून पूरग्रस्तांना योग्य मदत केली जाणार असून मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत करण्यात येणार आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

सध्या 390 पाणीपुरवठा योजना बंद आहेत. 67 हजार हेक्टर शेतजमीन पाण्याखाली गेली आहे. याशिवाय, महापुराच्या संकटानंतर आता रोगराईची भीती आहे. मात्र, नागरिकांनी घाबरुन जाऊ नये. रोगराईवर उपाय करण्यासाठी मुंबईहून डॉक्टर याठिकाणी आणले जाणार आहेत. तसेच, योग्य वेळी राष्ट्रीय आपत्ती घोषित करु असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. याचबरोबर, आलमट्टी धरणातून पाणी सोडण्यास कर्नाटक सरकारची मंजूरी घेण्यात आली आहे. त्यामुळे सांगलीतील पाणी पातळी कमी होण्यास मदत होईल असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (एनडीआरएफ), राज्य आपत्ती निवारण दल (एसडीआरएफ), भारतीय हवाई दल, नौदल, कोस्टल गार्ड आदी संस्थांचे चमू कार्यरत आहेत. कोल्हापूर परिसरात एकूण 22 मदत पथके कार्यरत असून त्यामध्ये एनडीआरफ-5, नेव्ही-14, कोस्टगार्ड-1, आर्मी कॉलम -1, एसडीआरएफ-1 आदींचा समावेश आहे. तसेच सांगलीमध्ये एकूण 11 पथके कार्यरत असून त्यामध्ये एनडीआरएफ-8, कोस्टगार्ड-2 आणि आर्मी-1 आदींचा समावेश आहे.

त्याचप्रमाणे मदतकार्यासाठी आणखी पथके मागविण्यात आली असून पाच पथके पुण्यापर्यंत पोहोचली असून कोल्हापूर व सांगलीकडे येण्यास प्रत्येकी दोन पथके मार्गस्थ झाली आहेत. तसेच त्यातील एक पथक पुण्यात कार्यरत आहे.  कोस्टगार्डची आणखी दोन पथके कोल्हापूरमध्ये आणि नौदलाची पाच व एसडीआरएफची दोन पथके सांगलीमध्ये पोहोचत आहेत. गतिमान बचाव कार्यासाठी आणखी पाच एनडीआरएफ टीम मागविण्यात आल्या असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी विशेष रेल्वे गाडी
कोल्हापूर आणि सांगली परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे रस्तेवाहतूक विस्कळीत झाली आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाकडून मिरज आणि कराड दरम्यान विशेष रेल्वे चालवण्यात येणार असल्याचे रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी मुख्यमंत्र्यांना कळविले आहे.

Web Title: Maharashtra Floods : We will help those affected by the floods - CM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.