सीमावासीयांना मंत्र्यांनी घातली भावनिक साद
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2020 04:48 AM2020-10-31T04:48:08+5:302020-10-31T04:48:34+5:30
१ नोव्हेंबर हा कर्नाटक राज्याचा स्थापना दिवस सीमाभागात ‘काळा दिवस’ म्हणून पाळला जातो. यंदा महाराष्ट्रातील मंत्रीही काळ्या फिती लावून हा दिवस पाळणार आहेत. रविवारी हा दिवस येत असल्याच्या पार्श्वभूमीवर सीमावासीयांच्या भावना तीव्र आहेत.
कोल्हापूर - तुम्ही सीमावासीयांनी मोठी झळ सोसली केली आहे. तुमचे बलिदान, त्याग, धाडस याचे खूप मोठे उपकाराचे ओझे महाराष्ट्राच्या मनावर आहे. त्याची परतफेड करण्याचा प्रयत्न आम्ही सीमालढ्यातील छोटे शिपाई या नात्याने राजकीय जीवनाचे प्रतिनिधी म्हणून करत आहोत. सीमाभाग महाराष्ट्रात येईल तेव्हाच कर्तव्यपूर्तीचे समाधान मिळेल, हा ऐतिहासिक क्षण येईपर्यंत आम्ही तुमच्यासोबत आहोत, अशी भावनिक साद सीमाभाग समन्वय मंत्री छगन भुजबळ व एकनाथ शिंदे यांनी सीमाभागातील जनतेला उद्देशून लिहिलेल्या पत्रातून घातली आहे.
१ नोव्हेंबर हा कर्नाटक राज्याचा स्थापना दिवस सीमाभागात ‘काळा दिवस’ म्हणून पाळला जातो. यंदा महाराष्ट्रातील मंत्रीही काळ्या फिती लावून हा दिवस पाळणार आहेत. रविवारी हा दिवस येत असल्याच्या पार्श्वभूमीवर सीमावासीयांच्या भावना तीव्र आहेत. या भागातील सांस्कृतिक संस्था, वाचनालये यांनाही मदत दिली जात आहे. त्याची जाण असलेल्या महाराष्ट्र सरकारने या दिवशी सीमावासीयांच्या जखमेवर पत्राद्वारे फुंकर घालण्याचा प्रयत्न केला आहे. शासनाने नियुक्त केलेल्या सीमाभाग समन्वय समितीने हे पत्र पाठविले आहे. राष्ट्रवादीचे छगन भुजबळ व शिवसेनेचे एकनाथ शिंदे या दोन मंत्र्यांचा समावेश असलेल्या समितीने पाठविलेल्या पत्रात सीमाभागातील जनतेसाठी सुरू असलेली कामे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांच्याकडून सुरू असलेला पाठपुरावा यांनाही पत्राद्वारे उजाळा दिला आहे.
सीमाकक्ष नव्याने केला कार्यान्वित
शासनाकडून सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या दाव्यासाठी कायदेशीर बाबींची पूर्तता युद्धपातळीवर सुरू आहे. सीमाकक्ष नव्याने जोमाने कार्यान्वित केला आहे. शिक्षण, सामाजिक न्याय, मराठी भाषा या विभागांशी समन्वय साधून ८३५ खेड्यांसाठी निर्णयांचे एकत्रिकरण सुरू आहे. जनता ही महाराष्ट्राचीच आहे, राज्यातील सवलती सीमाभागातील जनतेलाही उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे.