महाराष्ट्राने इतकी घाणेरड्या वृत्तीची गद्दारी कधीही बघितली नाही : आदित्य ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2022 05:27 PM2022-08-02T17:27:36+5:302022-08-02T18:14:26+5:30
ज्यांना आपले समजलो अशा ४० आमदार व १२ खासदारांनी गद्दारी केली. त्यांना जनताच जागा दाखवणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जयसिंगपूर : शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी ज्यांना सर्व काही दिले त्यांनीच कठीण काळात पक्षप्रमुखांशी गद्दारी करुन पाठीत खंजीर खुपसला. महाराष्ट्राने घाणेरड्या वृत्तीची गद्दारी कधीही बघितली नाही. अनेक वर्षे काही लोक मला सांगायचे, राजकारणात येऊ नको, राजकारणात चांगल्या लोकांना स्थान नसते. त्यामुळेच या शिवसंवाद यात्रेतून केवळ महाराष्ट्राला नाही देशाला व जगाला मला सिध्द करुन दाखवायचे आहे की, राजकारणात चांगल्या लोकांना स्थान असते, अशी ग्वाही शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी जयसिंगपूर येथे विक्रमसिंह मैदानावर झालेल्या सभेत शिवसैनिकांना दिली.
आदित्य यांनी व्यासपीठावरुन खाली येवून उपस्थितांशी संवाद साधला. ज्या आमदार, खासदारांना मित्र समजलो, बोट दाखविला तेथे निधी दिला, मानसन्मान दिला. मात्र ज्यांना मित्र समजलं त्यांनीच पाठीत खंजीर खुपसला. ज्यांना आपले समजलो अशा ४० आमदार व १२ खासदारांनी गद्दारी केली. त्यांना जनताच जागा दाखवणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी सभेत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे राजकारणी असल्याची टिकाही ठाकरे यांनी केली. जयसिंगपूर येथे झालेल्या सभेस उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.