सौंदत्ती यात्रेतील भाविकांसाठी पोलिस बंदोबस्तात वाढ, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे बेळगावच्या एसपींचे आवाहन
By भीमगोंड देसाई | Published: December 7, 2022 03:38 PM2022-12-07T15:38:44+5:302022-12-07T15:41:02+5:30
सौंदत्ती येथे यात्रा स्थळावर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये, यासाठी बंदोबस्तात वाढ
कोल्हापूर : बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती येथील रेणुका देवीच्या यात्रेसाठी दाखल झालेल्या भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आज, बुधवारी कर्नाटक पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केली आहे. मंदिर परिसरात आणि महाराष्ट्रातील भाविक मोठ्या संख्येने जाणाऱ्या गोडची येथे कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. दर्शन सुरळीत आणि शांततेत सुरू आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन बेळगावचे जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी केले आहे.
सौंदत्ती येथे यात्रेसाठी मंगळवारपासून महाराष्ट्रातील भाविक मोठया संख्येने दाखल झाले आहेत. दरम्यान, कन्नड संघटनांनी कर्नाटकातील बागेवाडी टोल नाक्यावर महाराष्ट्र पासिंगच्या वाहनांवर दगडफेक केली. त्यानंतर भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे कर्नाटक पोलिस मंगळवारी रात्रीपासून महाराष्ट्रातून सौंदत्तीला जाणाऱ्या प्रमुख मार्गावर तैनात आहेत.
सौंदत्ती येथे यात्रा स्थळावर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये, यासाठी बंदोबस्तात वाढ केली आहे. तेथील जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. संजीव पाटील हे मंदिर परिसरात ठाण मांडून आहेत. कोणत्याही परिस्थितीत भाविकांच्या सुरक्षिततेला बाधा येवू नये, यावर लक्ष केंद्रीत केले आहे.
गोडची येथेही पोलिस बंदोबस्त
बेळगाव जिल्ह्यातील गोडची (ता. रामदूर्ग) येथील वीरभद्र देवस्थान येथे सौंदत्तीला गेलेले महाराष्ट्रातील भाविक मोठया संख्येने दर्शनासाठी जातात. येथेही सध्या महाराष्ट्रातील भाविकांची मोठी गर्दी आहे. म्हणून येथेही पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.