कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या शिवसैनिकांना कोगनोळीजवळ घेतले ताब्यात, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2022 07:40 PM2022-12-06T19:40:12+5:302022-12-06T19:54:44+5:30
महाराष्ट्र-कर्नाटकात तणावपुर्ण परिस्थिती
बाबासो हळिज्वाळे
कोगनोळी : महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवर कन्नड रक्षण वेदीकेच्या गुंडांनी महाराष्ट्राच्या बसेस, ट्रक फोडल्याने राज्यातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी बेळगाव दौरा रद्द केला आहे. अशातच, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी जर परिस्थिती नियंत्रणात आली नाही तर आपण स्वत: बेळगावमध्ये जाऊ असा इशारा दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सद्या महाराष्ट्र-कर्नाटकात तणावपुर्ण परिस्थिती आहे.
दरम्यान या तणावपुर्ण वातावरणातच शिवसेना ठाकरे गटाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष विजय देवणे व संजय पवार यांनी कर्नाटकात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. कोगनोळी येथील दूधगंगा नदी जवळ देवणे यांनी पळत जाऊन कर्नाटकात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना महाराष्ट्र पोलिसांनी रोखून धरले व ताब्यात घेतले. यावेळी कार्यकर्त्यांनी मंत्री शंभूराजे देसाई यांच्या विरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या. तर बांगड्यांचा आहेर देऊन निषेध व्यक्त केला.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमेस पोलीस छावणीचे स्वरूप
महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर महाराष्ट्र पोलिसांकडून दोन पोलीस उपाधीक्षक, चार निरीक्षकांसह जवळपास शंभर पोलिसांचा फौजफाटा तर कर्नाटक पोलिसांकडून जिल्हा पोलीस प्रमुख, अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख, तीन उपाधीक्षक, बारा निरीक्षक ३० उपनिरीक्षकांसह जवळपास ५०० पोलिसांचा ताफा तैनात केला आहे. त्यामुळे दूधगंगा नदीस पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.
सीमा भागातील मराठी भाषिकांमध्ये नाराजी
सीमा भाग समन्वयक मंत्री चंद्रकांत पाटील व शंभूराजे देसाई यांनी दोन वेळा बेळगाव दौरा आयोजित केला पण ते एकदाही बेळगावला गेले नाहीत. दोन्ही वेळी त्यांनी दौरा रद्द केला. समन्वय मंत्री प्रथमच बेळगाव दौरा करत असल्याने महाराष्ट्र एकीकरण समितीने पूर्ण तयारी केली होती. परंतु दौरा रद्द झाल्याने सीमा भागातील मराठी भाषिकांमध्ये नाराजी पसरली.