maharashtra-karnatak border dispute: तब्बल २४ तासानंतर सुरू झालेली बससेवा पुन्हा बंद, प्रवाशांची गैरसोय
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2022 12:40 PM2022-12-07T12:40:29+5:302022-12-07T12:51:54+5:30
खासगी वाहनांकडून प्रवाशांची लूट
बाबासो हळिज्वाळे
कोगनोळी : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील गावांवर दावा सांगितल्याने महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा उफाळला आहे. याचे संतप्त पडसाद सीमा भागातील मराठी भाषिकांसह महाराष्ट्रभर उमटू लागले आहेत. काल, बुधवारपासून दोन्ही राज्यातील परिस्थिती चिघळताना दिसत आहे.
दोन्ही राज्यांमध्ये वाहनांवर दगडफेकीचे प्रकार घडू लागल्याने काल, मंगळवार सकाळ पासून कर्नाटकात जाणाऱ्या महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या बसेस थांबवण्यात आल्या. त्या पुन्हा आज, बुधवारी सकाळी परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याचे लक्षात आल्याने सुरू करण्यात आल्या होत्या. परंतु पुन्हा काही ठिकाणी वाहनांचे नुकसान करण्याचे प्रकार घडू लागल्याने अवघ्या दोन तासातच बससेवा बंद करण्यात आल्या.
समाजामध्ये घडणाऱ्या प्रत्येक घटनांचे पडसाद हे सार्वजनिक मालमत्तांवर उमटत असल्याचे दिसून येतात. महाराष्ट्र कर्नाटक सीमावादामुळे दोन्ही राज्यात एसटी महामंडळाच्या बसेसवरती दगडफेक होत आहे. यासर्व घटनेमुळे सर्वसामान्य नागरिक, प्रवाशांचे हाल होत आहेत.
खासगी वाहनांकडून प्रवाशांची लूट
एसटी बसेस बंद झाल्याने सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय झाली आहे. अशावेळी सर्वसामान्य नागरिक प्रवासासाठी खासगी वाहनांचा पर्याय निवडत आहेत. परंतु परिस्थितीचा गैरफायदा घेत खासगी वाहनांकडून प्रवाशांची लूट केली जात आहे. कागल ते निपाणी या अवघ्या २५ किलोमीटरच्या प्रवासासाठी २०० ते २५० रुपये मोजावे लागत आहेत.