Maharashtra Karnataka Border Dispute: मराठी बांधवांचा मेळावा उधळवण्यासाठी समिती नेते, कार्यकर्त्यांची धरपकड
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2022 12:02 PM2022-12-19T12:02:25+5:302022-12-19T12:02:59+5:30
मैदान सील, सर्व रस्ते बॅरिकेड्स टाकून बंद
प्रकाश बेळगोजी
बेळगाव: महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने शहरातील टिळकवाडी येथील व्हॅक्सिन डेपो मैदानावर आज सोमवारी सकाळी मराठी भाषिकांच्या महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास उपस्थित राहण्यास महाराष्ट्रातील नेत्यांना मज्जाव करण्याबरोबरच ऐनवेळी या मेळाव्याची परवानगी रद्द करून आज सकाळी पोलिसांनी डेपो मैदानाच्या ठिकाणी समिती नेते आणि कार्यकर्त्यांची धरपकड करण्यास सुरुवात केल्यामुळे मराठी भाषिकात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीचा महामेळावा होऊ नये यासाठी समिती नेते मंडळींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून एपीएमसी पोलीस ठाण्यात त्यांना स्थानबद्ध केले आहे. व्हॅक्सिन डेपो मैदानाच्या ठिकाणी आज सकाळी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किनेकर आणि काही समिती कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
किणेकर यांनी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. तथापि त्यांचे ऐकून न घेता पोलीस अधिकारी नेत्यांना पोलीस व्हॅनमध्ये घालून एपीएमसी पोलीस ठाण्याच्या दिशेने रवाना केले. त्यावेळी पोलिसांच्या ताब्यात जात असताना मनोहर किनेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बेळगाव कारवार बिदर भालकी सहसंयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, रहेंगे तो महाराष्ट्र मे नही तो जेल मे आदी घोषणा देऊन आपला निषेध केला.
मैदान सील, सर्व रस्ते बॅरिकेड्स टाकून बंद
महामेळाव्यासाठी येणाऱ्या समितीचे नेते व कार्यकर्त्यांना एपीएमसी पोलीस ठाण्याशेजारी जे सभाभवन आहे. त्या ठिकाणी स्थानबद्धतेत ठेवले जात आहे. दरम्यान व्हॅक्सिन डेपो मैदानाच्या चारी बाजूने सील बंद करण्यात आल्या असून या परिसरात 144 कलमान्वये जमावबंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे. त्याप्रमाणे मैदानाच्या ठिकाणी जाण्यास कोणालाही परवानगी दिली जात नाही आहे. मैदानाच्या ठिकाणी जाणारे सर्व रस्ते बॅरिकेड्स टाकून बंद करण्यात आले आहेत. मैदानाच्या ठिकाणी फक्त प्रसार माध्यम प्रतिनिधी आणि पोलिसांना प्रवेश दिला जात असून मेळाव्यासाठी येणाऱ्या समिती कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन त्यांची रवानगी एपीएमसी पोलीस ठाण्याच्या दिशेने केली जात आहे.
सीमा भागातील मराठी भाषिकांची महाराष्ट्रात जाण्याची इच्छा प्रकट करण्यासाठी तसेच कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाच्या निषेधार्थ महाराष्ट्र एकीकरण समितीचा बेळगाव येथे दरवर्षी मेळावा होतो. त्यानुसार यंदाही हा मेळावा आज सोमवारी सकाळी टिळकवाडीतील व्हॅक्सिन डेपो मैदानावर होणार होता. त्याची संपूर्ण तयारी ही झाली होती. या मेळाव्याला प्रशासनाने परवानगी दिल्याचं एकीकरण समितीने सांगितला होतं. मात्र अचानक ती परवानगी रद्द करण्यात आली असून डेपो मैदान परिसरात 144 कलमान्वये जमावबंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर आज सकाळी कायदा व सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक एडीजीपी अलोक कुमार यांनी आज सकाळी व्हॅक्सिन डेपो मैदानाला भेट देऊन पोलीस बंदोबस्ताची पाहणी केली. शहराचे पोलीस उपायुक्त रवींद्र गडादी यांनी मेळाव्याला परवानगी नसल्याचे आणि मैदान परिसरात जमाबंदी लागू असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्या ठिकाणी चार पेक्षा अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही. या मेळाव्याला परवानगी दिली नव्हती असं पोलिसांचं म्हणणं आहे मात्र महाराष्ट्र एकीकरण समितीने ही मराठी भाषिकांची गळचेपी असल्याचं म्हटलं आहे.