महामेळाव्यासाठी महाविकास आघाडीचे नेते बेळगावच्या दिशेने रवाना, कोगनोळी टोलनाक्यावर मोठा पोलिस बंदोबस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2022 12:18 PM2022-12-19T12:18:50+5:302022-12-19T12:22:11+5:30

मेळावा उधळवण्यासाठी समिती नेते, कार्यकर्त्यांची धरपकड

Maharashtra Karnataka Border Dispute, Leaders of Mahavikas Aghadi left for Belgaum for Mahamelawi, Huge police presence at Kognoli toll booth | महामेळाव्यासाठी महाविकास आघाडीचे नेते बेळगावच्या दिशेने रवाना, कोगनोळी टोलनाक्यावर मोठा पोलिस बंदोबस्त

महामेळाव्यासाठी महाविकास आघाडीचे नेते बेळगावच्या दिशेने रवाना, कोगनोळी टोलनाक्यावर मोठा पोलिस बंदोबस्त

Next

कोल्हापूर: महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरुन दोन्ही राज्यात तणावाचे वातावरण बनले आहे. यातच आज बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचा महामेळावा होत आहे. शहरातील टिळकवाडी येथील व्हॅक्सिन डेपो मैदानावर या महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी कोल्हापुरातून महाविकास आघाडीचे नेते, कार्यकर्ते रवाना झाले आहेत.

कोगनोळी टोलनाक्यावर मराठी बांधवांची मोठी गर्दी झाली आहे. कर्नाटकात जाण्यास महाविकास आघाडीचे नेते आक्रमक झाले आहेत. मात्र टोलनाक्यावर पोलिसांचा मोठा फोजफाटा तैनात करण्यात आला आहे. यावेळी कर्नाटकात प्रवेश करत असताना मराठी बांधवांची कर्नाटक पोलिसांशी झटापट झाली.


दरम्यान आजच कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यामुळे या महामेळाव्याला कर्नाटकने अचानक परवानगी नाकारली आहे. बेळगावमध्ये कलम 144 लागू करण्यात आले असून जमावबंदी लागू करण्यात आली आहे. बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. दुसरीकडे, महाराष्ट्रातील नेते बेळगावला जाण्यासाठी आक्रमक झाले आहेत. 

मेळावा उधळवण्यासाठी समिती नेते, कार्यकर्त्यांची धरपकड

कर्नाटक पोलिसांनी डेपो मैदानाच्या ठिकाणी समिती नेते आणि कार्यकर्त्यांची धरपकड करण्यास सुरुवात केल्यामुळे मराठी भाषिकात तीव्र संताप व्यक्त होत आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचा महामेळावा होऊ नये यासाठी समिती नेते मंडळींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून एपीएमसी पोलीस ठाण्यात त्यांना स्थानबद्ध केले आहे. 

सीमा भागात २१ ठिकाणी तपासणी नाके 

सरकारच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून सीमा भागात विविध २१  ठिकाणी तपासणी नाके (चेक पोस्ट) उभारण्यात आले आहेत. या ठिकाणी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह एकूण २३० पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे. एकंदर या अधिवेशनासाठी ५००० हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अधिवेशनादरम्यान कायदा आणि सुव्यवस्था भंग होऊ नये यासाठी सर्वतोपरी खबरदारी घेण्यात आली आहे.

Web Title: Maharashtra Karnataka Border Dispute, Leaders of Mahavikas Aghadi left for Belgaum for Mahamelawi, Huge police presence at Kognoli toll booth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.