Kolhapur: महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील-हर्षवर्धन सदगीर यांच्यातील कुस्ती बरोबरीत, तीन लाखांच होतं बक्षीस
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2024 03:31 PM2024-05-15T15:31:08+5:302024-05-15T15:31:46+5:30
अमर पाटील कळंबा : कळंबा गावचे ग्रामदैवत श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले ...
अमर पाटील
कळंबा : कळंबा गावचे ग्रामदैवत श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. काल, मंगळवारी कळंबा तलाव परिसरात आयोजित प्रथम क्रमांकाची तीन लाखांची कुस्ती महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील विरुद्ध महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर यांच्यात झाली. कुस्ती बराचवेळ चालल्याने अखेर बरोबरीत सोडवण्यात आली.
प्रथम क्रमांकाची दोन लाखांची कुस्ती हसन पटेल उपमहाराष्ट्र केसरी पुणे विरुद्ध सोनूकुमार पंजाब केसरी यांच्यात झाली. ज्यात हसडा डावावर हसन पटेल विजयी झाला. एक लाखाची द्वितीय क्रमांकाची कुस्ती श्रीमंत भोसले इचलकरंजी विरुद्ध उदयराज पाटील मोतीबाग बरोबरीत सोडवण्यात आली. तृतीय क्रमांकासाठी एकावन्न हजारांच्या दोन कुस्त्या पार पडल्या ज्यात प्रवीण पाटील कुंभी विरुद्ध सुभाष निउंगरे मोतीबाग कुस्ती बरोबरीत सोडवण्यात आली तर पृथ्वीराज पाटीलने पार्थ कळंत्रेचा पराभव केला. चौथ्या क्रमांकासाठी एकतीस हजारांच्या कुस्तीत प्रतीक म्हेतरने विनायक वासकरचा तर आदित्य सुतारने किशोर धनगरला चितपट करत विजय मिळवला. एकवीस हजाराच्या कुस्तीत तेजस मोरेने सुदर्शन पाटीलला चितपट केले.
सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते मैदान पूजन करण्यात आले. यावेळी आयोजित दीडशे लहानमोठ्या चटकदार कुस्त्यांनी प्रेक्षकांचे पारणे फेडले. उपमहाराष्ट्र केसरी रामा माने, तानाजी पाटील, प्रकाश पाटील यांनी पंच म्हणून काम पाहिले. राजाराम चौगुले यांच्या निवेदनाने तर रोहन भोसले यांच्या हलगी वादनाने कुस्तीची रंगत वाढवली.
स्पर्धेचे नेटके आयोजन श्री महालक्ष्मी तालीम मंडळ, राम तालीम मंडळ, श्री हनुमान तालीम मंडळ संग्राम चौगुले, अमोल पाटील, सोमनाथ शिंदे विशाल तिवले यांनी केले होते. माजी सरपंच सागर भोगम, संतोष लोहार अरुण टोपकर व अन्य मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.