महाराष्ट्र केसरी पृथ्वीराजची हत्तीवरून मिरवणूक, माजी आमदार चंद्रदीप नरकेंनी दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 12:39 PM2022-04-13T12:39:31+5:302022-04-13T12:43:53+5:30
महाराष्ट्र केसरी गदा पटकावणारा पृथ्वीराज हा कुंभी कारखान्याचा मानधनधारक मल्ल आहे. त्याने स्व. नरकेंची स्वप्नपूर्ती केली आहे. म्हणून पृथ्वीराजचा सत्कार व हत्तीवरून मिरवणूक अशा सोहळ्याचे आयोजन शुक्रवारी (दि.१५) केले आहे.
कोपार्डे : कुंभी कासारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील मल्लाने महाराष्ट्र केसरीची गदा पटकावावी हे डी. सी. नरके यांचे स्वप्न होते. यासाठी कारखान्याच्या वतीने कार्यक्षेत्रातील मल्लांसाठी मानधनधारक कुस्ती स्पर्धांचे आयोजन केले जाते. महाराष्ट्र केसरी गदा पटकावणारा पृथ्वीराज हा कुंभी कारखान्याचा मानधनधारक मल्ल आहे. त्याने स्व. नरकेंची स्वप्नपूर्ती केली आहे. म्हणून पृथ्वीराजचा सत्कार व हत्तीवरून मिरवणूक अशा सोहळ्याचे आयोजन शुक्रवारी (दि.१५) केले आहे. पृथ्वीराजची सांगरूळ फाटा ते कारखाना कार्यस्थळावरील छ. शाहू महाराजांच्या पुतळ्यापर्यंत मिरवणूक काढण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष माजी आ. चंद्रदीप नरके यांनी दिली.
कारखान्याच्या मुख्य सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपाध्यक्ष निवास वातकर, कुंभी बँकेचे अध्यक्ष, अजित नरके, सर्व संचालक, कार्यकारी संचालक अशोक पाटील, सचिव प्रशांत पाटील,डी. एस. राऊत, प्राचार्य आकीवाटे उपस्थित होते.
चंद्रदीप नरके म्हणाले, कुंभी कासारी कार्यक्षेत्रातील क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी कारखान्याच्या वतीने मोठे प्रयत्न करण्यात येत आहेत. याचा परिणाम फुटबॉल, हॉकी, नेमबाजी, हॉलीबॉल व कुस्ती या क्रीडा प्रकारात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार झाले आहेत. सातारा येथील महाराष्ट्र केसरी स्पर्धेत देवठाणे येथील पृथ्वीराज पाटील याने कोल्हापूरला २१ वर्षांनंतर महाराष्ट्र केसरीची गदा मिळवून दिली. कुंभी-कासारी कारखान्याच्या मानधनधारक कुस्ती स्पर्धेचा मानकरी असणाऱ्या पृथ्वीराजची ही कामगिरी अभिमानास्पद आहे. पृथ्वीराजची सांगरूळ फाट्यापासून कुंभी-कासारी कारखान्यावरील छ. शाहू महाराजांच्या पुतळ्यापर्यंत हत्तीवरून मिरवणूक काढून सत्कार करण्यात येणार आहे.
यावर्षी महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कुंभी कासारीचा मानधनधारक सुशांत तांबोळकर (पाचाकटेवाडी) याने ९२ किलो तसेच विजय पाटील (पासार्डे) याने ६१ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले. अतुल चेचर (पोर्ले), स्वप्निल पाटील (वाकरे), भगतसिंह खोत (माळवाडी-कोतोली), प्रवीण पाटील (चाफोडी) यांनी विविध गटात कास्यपदक पटकावले असून, या मल्लांचा ही सत्कार करण्यात येणार असल्याचे नरके यांनी सांगितले. या सोहळ्याला क्रीडाप्रेमींनी उपस्थित राहून यशस्वी मल्लांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन माजी आ. नरके यांनी केले.