केजरीवालांसारखा कारभार महाराष्ट्रात व्हायला हवा, आरोग्य राज्यमंत्र्यांकडून सरकारला घरचा आहेर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2022 01:23 PM2022-03-19T13:23:28+5:302022-03-19T13:26:03+5:30

कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणजे महाविकास आघाडी नव्हे. शिवसेना हा देखील यामध्ये एक महत्वाचा घटक आहे. त्यामुळे निधी देताना आमचाही विचार व्हावा अशी अपेक्षा यड्रावकर यांनी व्यक्त केली.

Maharashtra should be governed like Kejriwal, Minister of State for Health Rajendra Patil Yadravkar expressed his views | केजरीवालांसारखा कारभार महाराष्ट्रात व्हायला हवा, आरोग्य राज्यमंत्र्यांकडून सरकारला घरचा आहेर

केजरीवालांसारखा कारभार महाराष्ट्रात व्हायला हवा, आरोग्य राज्यमंत्र्यांकडून सरकारला घरचा आहेर

googlenewsNext

कोल्हापूर : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत जो कारभार केला त्याच्या बळावर त्यांनी पंजाब हे दुसरे राज्य जिंकले. असा कारभार महाराष्ट्रात व्हायला हवा अशी अपेक्षा शिवसेनेचे नेते आणि आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी येथे व्यक्त केली.

जिल्हा परिषदेच्या शिक्षण आणि आरोग्य विभागाच्या विविध पुरस्कारांचे वितरण मंत्री यड्रावकर यांच्या हस्ते आज, शनिवारी दुपारी शिवाजी विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊ सभागृहात करण्यात आले. यावेळी बोलताना मंत्री यड्रावकरांनी आघाडी सरकारला घरचा आहेर दिला. ज्यांच्या नेतृत्वाखाली ही जिल्हा परिषद कार्यरत आहे असे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील यांची अनुपस्थिती यावेळी चर्चेची ठरली.

या पुरस्कार वितरण सोहळ्यास जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहूल पाटील, आमदार जयंत आसगावकर, उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना मंत्री यड्रावकर  म्हणाले, राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर जिल्हा परिषदेतही परिवर्तन झाले. आरोग्य विभागाने कोरोनाच्या काळात उत्तम काम केले. सर्वसामान्यांच्या आरोग्याला महाविकास आघाडी सरकारने प्राधान्य झाले. मोफत रेमडेसिविर वाटणारी कोल्हापूर जिल्हा परिषद ही राज्यातील एकमेव जिल्हा परिषद असल्याचेही त्यांनी सांगितले.

शिक्षण विषयात केजरीवाल सरकारने दिल्लीत चांगले काम केले आहे. आता तसेच काम महाराष्ट्रात होण्याची गरज आहे. जिल्हा परिषद शाळांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळाही सुरू कराव्यात. तसेच अनेक शिक्षक चांगले काम करतात. परंतू अजूनही अनेकांचे शिक्षणाव्यतिरिक्त इतरत्रच जास्त लक्ष असते. ते त्यांनी अध्यापनाकडे दिल्यास सर्वसामान्यांच्या मुलांना आणखी चांगले शिक्षण मिळू शकेल.

शिवसेनेलाही निधी द्या

पुन्हा महाविकास आघाडीची सत्ता जिल्हा परिषदेत यावी. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणजे महाविकास आघाडी नव्हे. शिवसेना हा देखील यामध्ये एक महत्वाचा घटक आहे. त्यामुळे निधी देताना आमचाही विचार व्हावा अशी अपेक्षा यड्रावकर यांनी व्यक्त केली.

Web Title: Maharashtra should be governed like Kejriwal, Minister of State for Health Rajendra Patil Yadravkar expressed his views

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.