३५ वर्षांनी ३५ हजार एस. टी. कर्मचारी उपस्थित राहणार, महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटेनेचे अधिवेशन होणार कोल्हापूरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 06:45 PM2020-01-29T18:45:34+5:302020-01-29T18:49:22+5:30
कोल्हापूर : तपोवन मैदानावर महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटनेचे ५६ वे वार्षिक अधिवेशन कोल्हापुरात १३ आणि १४ फेब्रुवारी रोजी ...
कोल्हापूर : तपोवन मैदानावर महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटनेचे ५६ वे वार्षिक अधिवेशन कोल्हापुरात १३ आणि १४ फेब्रुवारी रोजी होणार आहे. अधिवेशनाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती संघटनेचे विभागीय अध्यक्ष उत्तम पाटील आणि विभागीय सचिव वसंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
वसंत पाटील म्हणाले, ३५ वर्षांनी कोल्हापुरात या संघटनेचे अधिवेशन होत आहे. यासाठी राज्यातून ३५ हजार एस. टी. कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे तपोवनाच्या मैदानावर जय्यत तयारी करण्यात येत आहे. प्रमुख पाहुणे म्हणून परिवहन मंत्री अनिल परब, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची प्रमुख उपस्थिती आहे.
उत्तम पाटील म्हणाले, अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष विभागीय सचिव वसंत पाटील आहेत. १ जून २०१८ रोजी एकतर्फी घोषित केलेल्या ४८४९ कोटींमधील शिल्लक रक्कम संघटनेने दिलेल्या सूत्राप्रमाणे वाटप करण्यात यावी, एस. टी. महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावे, मागील काळात प्रसारित केलेली अन्यायकारक परिपत्रके रद्द करावी, एस. टी. महामंडळात विविध ठिकाणी होत असलेले खासगीकरण / कंत्राटीकरण रद्द करण्यात यावे यांचा पाठपुरावा करण्यात येणार आहे. या पत्रकार परिषदेला खजानिस मोहन मगदूम, सलीम मणेर, प्रमोद चव्हाण, शरद ताटे, विनायक भोगम, दिनकर पाटील, अरुणा पाटील होते.