‘राष्ट्रीय प्रज्ञा शोध’मध्ये महाराष्ट्र सलग सत्तावीस वर्षे अव्वल
By Admin | Published: March 4, 2015 12:41 AM2015-03-04T00:41:01+5:302015-03-04T00:46:17+5:30
राज्यातील ११२ विद्यार्थी पात्र : जिल्ह्यातील दोन विद्यार्थी
भीमगोंडा देसाई - कोल्हापूर -नवी दिल्लीतील राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षेत महाराष्ट्राने देशात पहिला क्रमांक मिळविला. यंदा राज्यातील ११२ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले असून, यांपैकी ९९ मुले आणि १३ मुली आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीमधील दोन विद्यार्थी पात्र ठरले आहेत. सलग २७ वर्षे देशात महाराष्ट्राने शिष्यवृत्तीमध्ये पात्र ठरण्यात ‘नंबर वन’ राखला आहे.
दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा घेतली जाते. शिष्यवृत्तीच्या माध्यमातून आर्थिक मदत केली जाते. सामान्य विज्ञान, समाजशास्त्र, (इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र), गणित, भूमिती यांसह सामान्य बौद्धिक क्षमता कसोटीवर परीक्षा घेण्यात आली.
सन २०१३-१४ या शैक्षणिक वर्षात झालेल्या परीक्षेत कोल्हापूर जिल्ह्यातून ३,४६६, तर संपूर्ण राज्यातून लाखावर विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. गुणवत्तेनुसार राज्यात शिष्यवृत्तीस पात्र विद्यार्थ्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. इचलकरंजी येथील हृषीकेश श्रीकांत शिंदे (आंतरभारती विद्यालय), शुभंकर प्रसाद रानडे (व्यंकटराव हायस्कूल) हे दोन विद्यार्थी पात्र ठरले आहेत. पात्र विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी दरमहा ५०० रुपये शिष्यवृत्ती, तर पीएच.डी. केल्यास चार वर्षे विद्यापीठ आयोगाच्या नियमानुसार आर्थिक मदत मिळणार आहे.
मराठी माध्यमाचे २२ आणि इंग्रजी माध्यमाचे ९०, तर राज्य शासनाचा अभ्यासक्रम शिकत असलेले ५६, ‘सीबीएसई’चे ५३, ‘आयसीएसई’चे ३ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. पात्र ठरलेल्यांमध्ये सर्वसाधारण जातींचे ९९,
अनुसूचित जातींचे १०, अनुसूचित जमातींचे २ आणि अपंग १, असे विद्यार्थी आहेत.
राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षेच्या राष्ट्रीय स्तरावर एक हजार शिष्यवृत्ती आहेत. यंदा राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षेत ११२ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत. गेली २७ वर्षे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी या परीक्षेत सर्वाधिक शिष्यवृत्ती मिळवून पहिला क्रमांक कायम राखला आहे, ही अभिमानाची बाब आहे.
- व्ही. बी. पायमल, आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद (पुणे)
दहा जिल्ह्यांत एकही नाही
सांगली, सिंधुदुर्ग, नंदुरबार, जालना, अमरावती, भंडारा, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, उस्मानाबाद या जिल्ह्यांतील एकही विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरलेला नाही. सातारा, रत्नागिरी, मुंबई (दक्षिण), अहमदनगर, नाशिक, धुळे, वाशिम, यवतमाळ, लातूर, परभणी या जिल्ह्यांतील प्रत्येकी एक विद्यार्थी पात्र ठरला आहे. उर्वरित जळगाव- ६, मुंबई (पश्चिम)- १०, मुंंबई (उत्तर)- ९, रायगड- ३, ठाणे - २०, पुणे- १२, सोलापूर- २,औरंगाबाद- १८, बीड- ५, बुलढाणा- २, अकोला- ७, नागपूर- २, गोंदिया- २, नांदेड- २.