Maharashtra Vidhan Sabha 2019:केपी-एवाय यांच्या उमेदवारीबाबत उद्या निर्णय शक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 01:24 PM2019-09-21T13:24:43+5:302019-09-21T13:27:57+5:30
राधानगरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉँग्रेसतर्फे माजी आमदार के. पी. पाटील, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्यापैकी कोणाला उमेदवारी मिळणार? याचा फैसला उद्या, रविवारी सातारा येथे होण्याची शक्यता आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, कर्मवीर जयंतीच्या निमित्ताने त्या दिवशी सातारा दौऱ्यावर आहेत.
कोल्हापूर : राधानगरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉँग्रेसतर्फे माजी आमदार के. पी. पाटील, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्यापैकी कोणाला उमेदवारी मिळणार? याचा फैसला उद्या, रविवारी सातारा येथे होण्याची शक्यता आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, कर्मवीर जयंतीच्या निमित्ताने त्या दिवशी सातारा दौऱ्यावर आहेत.
या मतदारसंघातून कोणाला उमेदवारी द्यायची, असा पेच राष्ट्रवादी कॉँग्रेससमोर निर्माण झाला आहे. के. पी. पाटील व ए. वाय. पाटील या दोन्ही मातब्बर नेत्यांनी निवडणूक लढण्याची जय्यत तयारी केली आहे. त्यामुळे दोघांनीही उमेदवारीवर दावा सांगितला आहे.
यापूर्वी मुंबईत झालेल्या पक्षाच्या बैठकीत पवार यांच्यासमोरच या दोन नेत्यांनी आमच्या दोघांपैकी कोणालाही उमेदवारी दिली तरी चालेल. तुमचा निर्णय आम्हाला मान्य असेल, असे स्पष्ट केले होत; परंतु त्यानंतर दोघांनीही आपल्यालाच उमेदवारी हवी, अशी मोर्चेबांधणी केली आहे.
मागच्या दोन दिवसांपूर्वी बीड येथे जाऊन ए. वाय. पाटील समर्थकांनी पवार यांची भेट घेतली होती आणि उमेदवारीबाबत निर्णय घ्यावा, अशी विनंती केली होती. त्यावेळी पवार यांनी मी दोन दिवसानंतर पुण्यात आल्यावर या दोघांनाही एकत्र बोलावून उमेदवारीचा निर्णय घेऊ, असे सांगितले होते. त्यामुळे रविवारी पुणे किंवा सातारा येथे या दोन नेत्यांसमवेत पवार यांची चर्चा होण्याची शक्यता आहे.
उमेदवारी कोणाला मिळते आणि ज्याला मिळाली नाही तो काय भूमिका घेणार, यावरच राष्ट्रवादीचे या मतदारसंघातील आव्हान किती ताकदीचे असेल, हे ठरणार आहे.