Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"निवडून आलो तर उपमुख्यमंत्री होऊ शकतो"; हसन मुश्रीफांचं मोठं वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 11:38 PM2024-10-28T23:38:46+5:302024-10-28T23:39:01+5:30
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : कागल विधानसभा मतदारसंघातून आज हसन मुश्रीफ यांनी अर्ज दाखल केला.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज कागल विधानसभा मतदारसंघात हसन मुश्रीफ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी बोलताना मुश्रीफ यांनी उपमुख्यमंत्रिपदाबाबत मोठं विधान केलं. या विधानाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा झाली.
यावेळी सभेत बोलताना हसन मुश्रीफ म्हणाले, राज्यात आमची पुन्हा सत्ता आली तर मला मंत्रिपद मिळेल, यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्रिपदाच्या घोषणा दिल्या. यावेळी हसन मुश्रीफ यांनी मी उपमुख्यमंत्री होऊ शकतो, असं विधान केलं. मी मुख्यमंत्री नाही पण झालो तर उपमुख्यमंत्री होऊ शकतो. काही राज्यात दोन, तीन उपमुख्यमंत्री होऊ शकतात मग आपल्याकडे का होऊ शकत नाहीत. पण काही लोकांचे गावात ग्रामपंचायत सदस्य नाहीत त्यांना मत देऊन फुकट घालवू नका, असा टोलाही विरोधकांना लगावला.
या वर्षीची प्रतिष्ठेची निवडणूक
गेली अनेक वर्ष कागल विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत असलेल्या हसन मुश्रीफ यांना यंदाची निवडणूक प्रतिष्ठेची असणार आहे. मधल्या काळात हसन मुश्रीफ यांच्यावर भाजपकडून अनेक आरोप झाले. तसेच, ईडीची चौकशी झाली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडली आणि शरद पवारांसाठी डोळ्यात अश्रु आणणारे हसन मुश्रीफ हे अजित पवारांच्या गटात गेले. त्यामुळे कागलमध्ये महायुतीचे तिकीट त्यांनाच मिळणार, हे जवळपास निश्चित झाले होते. अजित पवार यांनीही कागलमध्ये झालेल्या सभेत हसन मुश्रीफ यांची उमेदवारी जाहीर केली होती. आता विधानसभेसाठी कागलमधून अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे.