‘महाराष्ट्र क्वीन’ची विजयी सलामी : कोल्हापूर वूमेन्स लीग फुटबॉल स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 01:24 AM2018-05-22T01:24:31+5:302018-05-22T01:24:31+5:30
कोल्हापूर : मिशेल कास्टान आणि अंजू तमग यांनी नोंदविलेल्या गोलच्या जोरावर महाराष्ट्र क्वीन संघाने मल्टी वॉरिअर्स संघावर
कोल्हापूर : मिशेल कास्टान आणि अंजू तमग यांनी नोंदविलेल्या गोलच्या जोरावर महाराष्ट्र क्वीन संघाने मल्टी वॉरिअर्स संघावर ३-० अशा गोलने मात करून कोल्हापूर वुमेन्स लीग फुटबॉल स्पर्धेत सोमवारी विजयी सलामी दिली. छत्रपती शिवकन्या संघ आणि आर. आर. चॅलेंजर्स संघातील सामना गोलशून्य बरोबरीत सुटला.
येथील छत्रपती शाहू स्टेडियमवर कोल्हापूर वूमेन्स फुटबॉल क्लबतर्फे आयोजित या स्पर्धेचे उद्घाटन यशस्वीनीराजे यांनी ‘किकआॅफ’ करून केले. यावेळी मधुरिमाराजे या अध्यक्षस्थानी, तर स्वालिया थोडगे, मृणाल शिंदे, रूक्क्या थोडगे, माणिक मंडलिक, संभाजी पाटील-मांगोरे, राजेंद्र दळवी, मनोज जाधव, नितीन जाधव, प्रमोद पाटील, झुंजार सरनोबत, शरद माळी, आदी उपस्थित होते. विजय साळोखे यांनी सूत्रसंचालन केले.
स्पर्धेतील सलामीचा सामना ‘महाराष्ट्र क्वीन’ आणि ‘मल्टी वॉरिअर्स’ यांच्यात रंगला. पूर्वार्धात दोन्ही संघांनी एकमेकांच्या तोडीस तोड खेळ केल्याने सामना गोलशून्य बरोबरीत राहिला. उत्तरार्धात योग्य चाली रचत ‘महाराष्ट्र क्वीन’ ने सामन्यावर पकड मिळविली. त्यांच्या मिशेल कास्टान हिने सामन्याच्या ३८ व्या मिनिटाला पहिला गोल नोंदविला. त्यानंतर अंजू तमग हिने सामन्याच्या ४० व्या आणि ५६ व्या मिनिटाला गोल करून संघाला ३-० अशी आघाडी मिळवून दिली.
उर्वरीत वेळेत गोलची परतफेड करण्यात ‘मल्टी वॉरिअर्स’ अपयशी ठरले. त्यामुळे ‘महाराष्ट्र क्वीन’ने विजयी सलामी दिली. त्यांच्याकडून सोनिया राणा, प्रणाली चव्हाण, मिशेल कास्टाना, अंजू तमग यांनी, तर ‘मल्टी वॉरिअर्स’च्या तेजस्विनी कोळसे, पूजा धुमाळ, पृथ्वी गायकवाड, मुस्कान अत्तार, लॉरा इस्टीबोरो यांनी चांगला खेळ केला.
स्पर्धेतील दुसरा सामना ‘छत्रपती शिवकन्या’ आणि ‘आर. आर. चॅलेंजर्स’ यांच्यात झाला. सामन्यात दोन्ही संघांच्या आघाडीच्या फळीतील खेळाडूंनी वेगवान चढाया केल्या. मात्र, कधी त्यांच्या बचावफळीने, तर कधी गोलरक्षकाने त्या परतावून लावल्याने पूर्णवेळेत सामना गोलशून्य बरोबरीत राहिला. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला.या सामन्यात ‘छत्रपती शिवकन्या’कडून मृणाल खोत, ऐश्वर्या हवालदार यांनी, तर ‘आर. आर. चॅलेंजर्स’कडून गोलरक्षक रूपा मलिक, अनुष्का खतकर, प्रतीक्षा मिठारी यांनी चांगला खेळ केला.
उत्कृष्ट खेळाडू
या स्पर्धेतील पहिल्या सामन्यामधील अंजू तमंग, तेजस्विनी कोळसे आणि दुसऱ्या सामन्यातील मृणाल खोत, गोलरक्षक रूपा मलिक या उत्कृष्ट खेळाडू ठरल्या. त्यांना आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
आजचे सामने :
जाधव इंडस्ट्रीज वि. छत्रपती शिवकन्या (दुपारी तीन वाजता)
मल्टी वॉरिअर्स वि. आर. आर. चॅलेंजर्स (दुपारी
चार वाजता)