आजऱ्याजवळील रामतीर्थची महाशिवरात्री यात्रा रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:26 AM2021-03-10T04:26:42+5:302021-03-10T04:26:42+5:30
: आजऱ्याजवळील रामतीर्थची महाशिवरात्री यात्रा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन रद्द केली आहे. गुरुवार दि. ११ व शुक्रवार दि. ...
: आजऱ्याजवळील रामतीर्थची महाशिवरात्री यात्रा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन रद्द केली आहे. गुरुवार दि. ११ व शुक्रवार दि. १२ मार्च रोजी पुजारी व मानकऱ्यांच्या उपस्थितीत रामतीर्थवरील महादेव मंदिरात फक्त धार्मिक विधी होणार आहे, अशी माहिती आजऱ्याचे तहसीलदार विकास अहिर यांनी दिली आहे.
प्रतिवर्षी हिरण्यकेशी नदीकाठावर असलेल्या रामतीर्थवरील महादेव मंदिरात महाशिवरात्री यात्रा असते. महाशिवरात्रीच्या दिवशी विधीवत पूजा होते, तर दुसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणात यात्रा भरते. यात्रेसाठी आजरा, गडहिंग्लज, भुदरगड, चंदगड तालुक्यासह कोकण व कर्नाटकातून भाविक येतात. याचदिवशी आजऱ्यातील रवळनाथ मंदिरातून पालखी रामतीर्थवर जाते. त्याठिकाणी दर्शन झाल्यानंतर हिरण्यकेशी नदीच्या रामतीर्थच्या धबधब्याच्या डोहात नारळ फोडण्याचा विधी होतो. त्यानंतर यात्रेची सांगता होते. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भाविकांना मुख्य रस्त्यावर बॅरिकेडस् लावून अडविले जाणार आहे. कोणालाही दर्शनासाठी सोडले जाणार नाही. भाविकांनी दर्शनासाठी रामतीर्थवर येऊ नये, असेही आवाहन तहसीलदार विकास अहिर यांनी केले आहे.