Mahashivratri : तुजविण शंभो मज कोण तारी, कोल्हापूरात महाशिवरात्री उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 06:33 PM2018-02-13T18:33:56+5:302018-02-13T18:38:43+5:30
कैलासराणा शिवचंद्रमौळी, फणिंद्रमाथां मुकुटी झळाळी कारुण्यसिंधू भवदु:खहारी, तुजविण शंभो मज कोण तारी...शिवशंकराची स्तुतीस्तोत्र, ओम नम:शिवायचा जाप, रूद्राभिषेक, बेल, फूल, धूप, आरती, पालखी सोहळा प्रसाद वाटप, भजन, कीर्तन अशा मंगलमयी वातावरणात व धार्मिक उपक्रमांनी मंगळवारी महाशिवरात्री उत्साहात साजरी करण्यात आली.
कोल्हापूर : कैलासराणा शिवचंद्रमौळी, फणिंद्रमाथां मुकुटी झळाळी कारुण्यसिंधू भवदु:खहारी, तुजविण शंभो मज कोण तारी...शिवशंकराची स्तुतीस्तोत्र, ओम नम:शिवायचा जाप, रूद्राभिषेक, बेल, फूल, धूप, आरती, पालखी सोहळा प्रसाद वाटप, भजन, कीर्तन अशा मंगलमयी वातावरणात व धार्मिक उपक्रमांनी मंगळवारी महाशिवरात्री उत्साहात साजरी करण्यात आली.
यानिमित्त अंबाबाई मंदिरातील मातृलिंग भाविकांच्या दर्शनाखाली खुले करण्यात आले. वर्षातून काही महत्त्वाच्या दिवशीच उघडण्यात येणाऱ्या या मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती. अतिबलेश्वर मंदिरातही सकाळी रूद्रपूजा, अभिषेक करण्यात आला. मंगळवार पेठेतील ‘कैलासगडची स्वारी’ मंदिरात पहाटे महाअभिषेक करण्यात आला. त्यानंतर श्री सत्यसाई सेवा समितीतर्फे महारूद्र पठण झाले.
दुपारी कथा महाभारत ग्रंथाचे नित्य वाचन व सायंकाळी श्री मंगेशलक्ष्मी महिला मंडळातर्फे भजनाचा कार्यक्रम झाला. रावणेश्वर मंदिरात सकाळी सात वाजता लघुरूद्राभिषेक झाला. त्यानंतर सकाळी नऊ वाजल्यापासून ज्ञानेश्वर हंकारे यांचा अभंगवाणी, अमोल बुचडे यांचा भक्तिगीतांचा कार्यक्रम, स्वानंद महिला भजनी मंडळाचा अभंगवाणी, राजू मेस्त्री यांचे, तसेच अनघा पुरोहित यांचा भावगीते व भक्तिगीतांचा कार्यक्रम झाला. सायंकाळी यामपूजेला सुरुवात झाली. त्यात शिवमहिम्न स्तोत्र अभिषेक, रूद्राभिषेक व भस्मारती, मध्यरात्री शिवमहिम्न स्तोत्र अभिषेक व बिल्वार्चन पूजा झाली तसेच जागरण करण्यात आले.
शुक्रवार पेठ गंगावेशीतील ऋणमुक्तेश्वर मंदिरात सकाळी सहा वाजता महाअभिषेक व महापूजा झाली. सायंकाळी भव्य पालखी सोहळा काढण्यात आला. कोल्हापुरातील सर्वांत मोठे शिवलिंग असलेल्या उत्तरेश्वर मंदिरात पहाटे अभिषेक करण्यात आला. पूजेचे साहित्य, खेळणी, खाद्यपदार्थांच्या गाड्या आणि भाविकांच्या गर्दीने परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते. याशिवाय एस. टी. स्टँड चौकातील वटेश्वर मंदिरातही भाविकांची मोठी गर्दी होती. आर्ट आॅफ लिव्हिंग व दैवज्ञ शिक्षण समाज बोर्डिंगतर्फे दैवज्ञ बोर्डिंग येथे सायंकाळी रूद्रपूजा करण्यात आली. प. पू. श्री. श्री. रविशंकरजी यांचे शिष्य स्वामी ओंकारानंदजी यांनी मार्गदर्शन केले.