कोल्हापुरातील महिलांना महात्मा गांधी यांनी केले होते मार्गदर्शन तपोवन येथे भेट, विद्यापीठ हायस्कूलमध्ये महिला मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 12:44 PM2018-10-02T12:44:43+5:302018-10-02T12:47:00+5:30
संपूर्ण जगाला अहिंसेची शिकवण देणाऱ्या महात्मा गांधी यांचे विचार ऐकण्याचे भाग्य कोल्हापूरच्या अनेक महिलांना मिळाले होते. २४ आणि २५ मार्च १९२७ रोजी महात्मा गांधी यांनी कस्तुरबा यांच्यासह कोल्हापूरच्या तपोवनला भेट दिली होती.
- समीर देशपांडे
कोल्हापूर : संपूर्ण जगाला अहिंसेची शिकवण देणाऱ्या महात्मा गांधी यांचे विचार ऐकण्याचे भाग्य कोल्हापूरच्या अनेक महिलांना मिळाले होते. २४ आणि २५ मार्च १९२७ रोजी महात्मा गांधी यांनी कस्तुरबा यांच्यासह कोल्हापूरच्या तपोवनला भेट दिली होती. तसेच विद्यापीठ हायस्कूलमधील महिला मेळाव्यात या दोघांनीही भाषण केले होते. महात्मा गांधी यांच्या १५0 व्या जयंतीनिमित्त या आठवणी जाग्या झाल्या आहेत.
विद्यापीठ हायस्कूलचे एक संस्थापक दीक्षित गुरूजी शाळेतील विद्यार्थ्यांना राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांचे मार्गदर्शन मिळावे यासाठी कोल्हापुरात येणाºया सर्व मान्यवरांना शाळेमध्ये मार्गदर्शनासाठी बोलवायचे. कोल्हापुरात भरणाºया खादी प्रदर्शनाला भेट देण्यासाठी महात्मा गांधी येणार होते. ही संधी घेत तपोवनमध्ये राहणारे अनंतराव कटकोन, बाबू अण्णा कोठावळे, अनंतराव भुर्के, अनंतराव पार्टे या विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी यांना तपोवनवर आणण्याची जबाबदारी घेतली.
या सर्वांच्या प्रयत्नांना यश आले आणि २५ मार्च १९२७ रोजी महात्मा गांधी तपोवनवर आले. या ठिकाणी त्यांच्या हस्ते ‘चरखाश्रम’या वास्तूची कोनशिला बसवण्यात आली. यानंतर याच दिवशी अंबाबाई मंदिराजवळील विद्यापीठ हायस्कूलमध्ये महिला मेळावा झाला. महात्मा गांधी यांच्या हस्ते प्रारंभ झालेला चरखाश्रम पूर्ण झाल्यानंतर विद्यापीठ हायस्कूलचे तत्कालीन मुख्याध्यापक के. आर. कुलकर्णी तेथे सुतकताई करत असत. त्यांच्यानंतर दादा परांजपे, जयवंतराव सरनाईक यांनी सुतकताईचे काम केले. विद्यापीठ हायस्कूलच्या सर्व विद्यार्थ्यांना आठवड्यातून दोन तास सुतकताई शिकवली जात होती. महात्मा गांधींच्या या आठवणी आजही कोल्हापुरात सांगितल्या जातात.
कोल्हापुरात येणाºया सर्व क्षेत्रांतील मान्यवरांनी तपोवनवर यावे, विद्यापीठ हायस्कूलमध्ये यावे. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे, अशी दीक्षित गुरूजींची इच्छा असे. जयप्रकाश नारायण, मोरारजीभाई देसाई, यशवंतराव चव्हाण, संत मेहेर बाबा, संत तुकडोजी महाराज, डॉ. अरुंडेल असे अनेक मान्यवर आमच्या हायस्कूलमध्ये येऊन गेले आहेत. महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधी यांची भेट ही अशीच संस्मरणीय ठरली आहे.
प्रदीप गबाले -निवृत्त मुख्याध्यापक, विद्यापीठ हायस्कूल, कोल्हापूर.