महात्मा फुले कर्जमुक्तीची शेतकऱ्यांना प्रतीक्षा, योजनेला दोन वर्षे पूर्ण, तरीही पैसे मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2021 11:25 AM2021-12-07T11:25:19+5:302021-12-07T11:28:15+5:30

‘महात्मा फुलें’पेक्षा ‘शिवाजी महाराज’ योजनेचा अधिक लाभ. जिल्ह्यातील १ लाख ९७ हजार ५९६ शेतकऱ्यांना ३७३ कोटी ८१ लाख रुपयांचा लाभ मिळाला होता.

Mahatma Phule Debt relief awaits farmers | महात्मा फुले कर्जमुक्तीची शेतकऱ्यांना प्रतीक्षा, योजनेला दोन वर्षे पूर्ण, तरीही पैसे मिळेना

महात्मा फुले कर्जमुक्तीची शेतकऱ्यांना प्रतीक्षा, योजनेला दोन वर्षे पूर्ण, तरीही पैसे मिळेना

Next

राजाराम लोंढे

कोल्हापूर : राज्य शासनाने महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेच्या (Mahatma Jotirao Phule Shetkari Karjmukti Yojna)माध्यमातून थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची योजना आणली. जिल्ह्यातील ४८ हजार ८५७ शेतकरी पात्र होते, त्यापैकी आतापर्यंत ४७ हजार ८८१ शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. अद्याप एक हजार शेतकरी लाभापासून वंचित राहिले आहेत.

 
राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी आघाडी सरकारने महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आणली. सत्तेवर आल्यानंतर त्यांनी या योजनेची घोेषणा करत असतानाच नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णयही घेण्यात आला. कर्जमाफीसाठी जिल्ह्यातून ५१ हजार ७६१ इतके अर्ज प्राप्त झाले होते. शासनाच्या निकषानुसार त्यापैकी ४८ हजार ८५७ शेतकरी पात्र ठरले. संबधितांना आधार प्रमाणीकरण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार ४८ हजार ४२६ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केले. त्यापैकी ४७ हजार ८८१ शेतकऱ्यांना लाभ मिळाला. त्यांच्या खात्यावर २८५ कोटी ४२ लाख रुपये कर्जमाफीचे जमा झाले. उर्वरित आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या ५८१ शेतकऱ्यांना अद्याप पैसे मिळालेले नाहीत. त्याचबरोबर प्रमाणीकरणामध्ये काही तांत्रिक अडचणी आल्याने ४३७ जणांचे प्रमाणीकरण अडकले आहे. असे १ हजार १८ शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहिले आहेत.

‘महात्मा फुलें’पेक्षा ‘शिवाजी महाराज’ योजनेचा अधिक लाभ

देवेंद्र फडणवीस यांच्या महायुतीच्या सरकारने २०१७ मध्ये थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना आणली होती. यामध्ये थकबाकीदार, ‘ओटीएस’ व प्रोत्साहनपर अशा तीन टप्प्यात शेतकऱ्यांना लाभ मिळाला होता. तिन्ही प्रकारांत जिल्ह्यातील १ लाख ९७ हजार ५९६ शेतकऱ्यांना ३७३ कोटी ८१ लाख रुपयांचा लाभ मिळाला होता. त्या तुलनेत महात्मा फुले योजनेतून आतापर्यंत लाभ कमी मिळाल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत.

दृष्टिक्षेपात महात्मा फुले कर्जमुक्ती योजना -

अर्ज केलेले खातेदार -५१ हजार ७६१
पात्र खातेदार - ४८ हजार ८५७
यापैकी जिल्हा बँक - ३१ हजार ३२६, इतर बँका - १७ हजार ५३१.
आधार प्रमाणीकरण पूर्ण - ४८ हजार ४२०
अपूर्ण - ४३७
रक्कम वितरीत केलेले शेतकरी - ४७ हजार ८३९, रक्कम -२८५ कोटी ४२ लाख
तकारी असलेली एकूण खाती - १७८५
तक्रार निवारण केलेली - ५१८

Web Title: Mahatma Phule Debt relief awaits farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.