Kolhapur, Hatkanangle LokSabha Constituency: शाहू छत्रपती, सत्य'जित'च?; मंडलिक, शेट्टी, मानेंचाही दावा
By विश्वास पाटील | Published: May 9, 2024 12:04 PM2024-05-09T12:04:46+5:302024-05-09T12:05:19+5:30
कार्यकर्ते पैजा लावू लागले
विश्वास पाटील
कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती व हातकणंगलेतून याच आघाडीचे सत्यजित पाटील सरुडकर हे विजयाचे गीत गातील असे चित्र मतदानानंतर दोन्ही मतदारसंघांतील विविध घटकांशी बोलल्यानंतर पुढे आले आहे. त्यातील शाहू छत्रपती यांचा विजय अधिक स्पष्ट असून, हातकणंगलेत तिघांत कोण कुणाला मारक ठरतो याविषयीची उत्सुकता आहे. उमेदवारी जाहीर झाल्यापासून प्रत्यक्ष मतदानापर्यंत तयार झालेली हवा, लोकांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया, पडद्याआडच्या घडामोडी, पैशाचा वापर, लोकांनी हातात घेतलेली निवडणूक अशा अनेक घटकांचा विचार करूनच हा अंदाज बांधला आहे.
असे असले तरी मोदी यांच्याबद्धलची क्रेझ, भाजपसह राष्ट्रवादी (अजित पवार गट) चे भक्कम पाठबळ, कागल, चंदगड आणि राधानगरीतील मताधिक्क्यावर आपण नक्की बाजी मारू शकतो असा आत्मविश्र्वास मंडलिक गटाला वाटतो. म्हणूनच त्यांचे कार्यकर्ते पैजा लावू लागले आहेत. हातकणंगलेत शेवटच्या टप्प्यात लावलेल्या जोडण्या, वंचितच्या उमेदवारास जाणारी मते आपल्या पथ्यावर पडतील असे खासदार धैर्यशील माने यांना वाटते. शेतकऱ्यांतील सहानुभूती, एकट्याने झुंज दिल्याचे अप्रूप, चळवळीचा उमेदवार म्हणून लोक आपल्यालाच पुन्हा संधी देतील असा विश्र्वास खासदार राजू शेट्टी यांना आहे.
कोण बाजी मारु शकते, या अंदाजामागील काही आधार असे :
- शाहू छत्रपती व सत्यजित पाटील यांची उमेदवारी जाहीर झाल्यावरच त्यांच्याबद्दल मतदारसंघात चांगली हवा निर्माण झाली. खरेतर निकाल तिथेच निश्चित झाला. चांगच्या उमेदवारीनेच ५० टक्के पाया घातला. याउलट खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने यांना उमेदवारी मिळवण्यासाठीच झगडावे लागले. इथेच ते बॅकफूटवर जाण्यास सुरुवात झाली. कोल्हापुरात गेल्या निवडणुकीची सुरुवातच धनंजय महाडिक नकोत अशी झाली होती. या निवडणुकीत माने-मंडलिक नकोत अशी नकारात्मक सुरुवात झाली, त्यातून निवडणूक अखेरपर्यंत बाहेर आली नाही. महेश जाधव, प्रकाश आवाडे यांच्या विधानाने त्याची वात लावून दिली.
- मंडलिक व माने यांच्याबद्दल दोन समान नकारात्मक गोष्टी त्यांना लढतीतून मागे ढकलण्यास कारणीभूत ठरल्या. ज्या उद्धव ठाकरे यांंनी झेंडा हातात दिल्यामुळे तुम्ही खासदार झाला, त्यांच्याशी तुम्ही गद्दारी केल्याने लोकांत चीड होती. खासदार म्हणून तुम्ही लोकांना भेटला नाही, फोन घेतले नाहीत. शिंदेसेनेत विकासासाठी गेलो म्हणाला, परंतु कोणता विकास केला हेदेखील प्रभावीपणे मांडता आले नाही. उद्धव ठाकरे यांच्याबद्दल लोकांत सहानुभूती होती. शिवाय त्यांचे कार्यकर्ते आक्रमकपणे बदला घेण्यासाठी मैदानात उतरले.
- शाहू छत्रपती व सत्यजित यांची लोकसभेच्या मैदानातील पाटी कोरी, कोणतेही गंभीर आरोप त्यांच्यावर झाले नाहीत. त्यातून त्यांची प्रतिमा निर्मिती झाली.
- दलित-मुस्लिम मतांची एकजूट महाविकास आघाडीच्या मागे उभी राहिली. महायुतीकडे मोदी ब्रँड होता, परंतु आता एकाच ब्रँडवर तिसऱ्यांदा मते मागताना प्रतिसाद मिळाला नाही. उलट केंद्र सरकारबद्दलची शेतकऱ्यांपासून सामान्य जनतेत नाराजीची भावना जास्त होती.
- ही निवडणूक शाहू छत्रपती विरुद्ध मंडलिक अशीच केंद्रित होईल असे प्रयत्न झाले. दत्तकविधानाचा मुद्दा प्रभावीपणे चालला नाही. राजा विरुद्ध प्रजा स्वरूप देण्याचे प्रयत्न झाले, परंतू ते लोकांना भावले नाही.
- या लढतीत मूळ मंडलिक गटच फायटिंग मूडमध्ये फारसा दिसला नाही. निवडणूक जाहीर झाल्यावर सदाशिवराव मंडलिक यांच्यावर प्रेम करणारे हाडाचे कार्यकर्ते साऱ्या मतदारसंघात पदरची भाकरी बांधून घेऊन फिरायचे, ती लढण्याची उर्मी दिसली नाही. बिद्री कारखान्याच्या निवडणुकीत संजय मंडलिक यांनी हमीदवाड्याच्या माळावर दुसऱ्यांदा कबर बांधण्याची मुश्रीफ गटाला दिलेली धमकी लोकसभेला मुश्रीफ गटाचे पाय मागे खेचायला कारणीभूत ठरली. प्रवीणसिंह घाटगे यांची उघड भूमिका घाटगे गटात संभ्रम निर्माण करणारी ठरली. त्यामुळे कागलमध्ये अपेक्षित मताधिक्य मिळण्याची शक्यता धूसर.
- कोल्हापूर लोकसभेच्या २००९ च्या निवडणुकीत नेते एका बाजूला आणि जनता दुसऱ्या बाजूला अशी लाट तयार झाली. अशीच सुप्त लाट या निवडणुकीतही दोन्ही मतदारसंघांत दिसून आली. त्यामुळे महायुतीकडे तगड्या नेत्यांची कागदावर बेरीज मोठी असूनही त्यांची ताकद प्रत्यक्ष मतदानात रूपांतरित करू शकली नाही, असे चित्र दिसले.
- आमदार सतेज पाटील यांनी गेल्या निवडणुकीत मंडलिक यांच्या विजयासाठी सगळ्यांना अंगावर घेतले. या निवडणुकीत त्यांनी त्यांच्या पराभवासाठी ही निवडणूक अंगावर घेतली. भाजपच्या विरोधात पाय रोवून उभी राहण्याची त्यांची जिगर लोकांना आवडली. महायुतीत कोण असे ताकदीने उभे राहिले नाही.
- शाहू महाराज यांना लोकांनी राजर्षी शाहूंच्याच रूपात पाहिले. त्यांच्याबद्दलची आस्था, सन्मान व छत्रपती घराण्याच्या ऋणातून उतराई होण्याची संधी म्हणूनही लोकांनी मतदानाकडे पाहिले.
- एकनाथ शिंदे यांना सोबत घेतले, अजित पवार यांंच्यावर एवढे भ्रष्टाचाराचे आरोप केले आणि त्यांना सोबत घेतल्याचा रागही लोकांच्या बोलण्यात होता. बापाने घर बांधले आणि मुलग्याने त्याला घराबाहेर काढले हे बरोबर झाले नाही अशी प्रतिक्रिया कसबा सांगाव (ता. कागल) मधील मतदाराने व्यक्त केली.
- हातकणंगले लोकसभा मतदारसंघात प्रथमच पश्चिम भागाला उमेदवारी मिळाली. त्यामुळे शाहूवाडीसह शिराळा, वाळवा मतदारसंघात सत्यजित यांच्याविषयी चांगले वातावरण तयार झाले. पूर्वेकडील हातकणंगले, शिरोळ, इचलकरंजीशी त्यांचा पाहुण्याच्या लग्नाला जाण्यापुरताच संपर्क होता. त्यामुळे तिकडचे लोक त्यांना स्वीकारतील का अशी चर्चा उमेदवारी मिळण्यापूर्वी होती, ती फोल ठरली. या तिन्ही मतदारसंघात उमेदवार म्हणून ते स्पर्धेत राहिले.
- राजू शेट्टी शेतकऱ्यांसाठी लढणारे नेते म्हणून शेतकऱ्यांसह विविध घटकांत त्यांच्याबद्दल जरूर सहानुभूती राहिली. परंतु, महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळवण्यात ते अपयशी झाले. स्वत:ची यंत्रणा, निधीपासून कार्यकर्त्यांपर्यंत त्यांना उभी करण्यात मर्यादा आल्या. शेतकऱ्यांना शंभर रुपये मिळवून देण्यासाठी ते झुंजले, परंतू हंगाम लांबल्याने नाराजी व्यक्त झाली. इचलकरंजीत शेवटच्या दिवशी जातीय ध्रुवीकरण झाल्याने माने पुढे सरकले.
- दोन्ही मतदारसंघात भाजपची यंत्रणा फारशी आक्रमक नव्हती. ते प्रचारात सगळीकडेच होते, परंतु जागा काढायची म्हणून जोडण्या लावण्यात मर्यादा आल्या. कारण उमेदवाराबद्दलची निष्क्रियता सगळ्या प्रयत्नांच्या आडवी उभी राहिली.
- महायुतीतील घटक पक्षांपेक्षा इंडिया आघाडीतील पक्षांची एकजूट जास्त एकजिनसी होती. छोटे-छोटे घटक त्यांनी सोबत घेतले. कुठेही विसंवाद होऊ दिला नाही. महायुतीत आवाडे-हाळवणकर यांच्यासारखे वाद शेवटपर्यंत धुमसत राहिले.