खोकेबाज सरकारला तडीपार करण्याची शपथ घेऊन कामाला लागा - उद्धव ठाकरे 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2024 04:50 PM2024-11-06T16:50:41+5:302024-11-06T16:52:31+5:30

महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक

Mahavikas Aghadi government work done Maharashtra number one in the country says Uddhav Thackeray | खोकेबाज सरकारला तडीपार करण्याची शपथ घेऊन कामाला लागा - उद्धव ठाकरे 

खोकेबाज सरकारला तडीपार करण्याची शपथ घेऊन कामाला लागा - उद्धव ठाकरे 

कोल्हापूर : पहिले अडीच वर्षे राज्यात महाविकास आघाडीच्या सरकारने केलेल्या कामांमुळे महाराष्ट्र देशात ‘नंबर वन’ बनला; पण गेल्या अडीच वर्षात राज्य रसातळाला नेण्याचे पाप गद्दारांनी केले. खोकेबाज सरकारला तडीपार करण्याची शपथ घेऊन कोल्हापूरकरांनी कामाला लागा, असे आवाहन उद्धवसेनेचे प्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. उजळाईवाडी (ता. करवीर) येथे मंगळवारी महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत हाेते. खासदार शाहू छत्रपती अध्यक्षस्थानी होते.

उद्धव ठाकरे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने गद्दारांना जागा दाखवली, त्याचप्रमाणे विधानसभेला त्यांना हद्दपार करायचे आहे. आई अंबाबाईच्या दर्शनाने प्रचाराची सुरुवात केली असून, कोल्हापूरकरांचा उत्साह पाहिल्यानंतर येथे निश्चित परिवर्तन होणार आहे. केवळ घोषणा देऊन उपयोग नाही, जोपर्यंत विजयाची पताका फडकत नाही तोपर्यंत थांबायचे नाही. खासदार शाहू छत्रपती, आमदार सतेज पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी आमदार जयंत आसगावकर, उद्धवसेनेचे उपनेते संजय पवार, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार राजू आवळे, सत्यजीत पाटील-सरुडकर, गणपतराव पाटील, के. पी. पाटील, समरजीत घाटगे, नंदिनी बाभूळकर, राहुल पाटील, मदन कारंडे, विजय देवणे आदी उपस्थित होते.

तोपर्यंत मतदान केंद्रे सोडू नका

मतदान पूर्ण झाल्यानंतर इव्हीएम मशीन बंद करताना त्याच्या क्रमांकाची नोंद घ्या. मतमोजणी दिवशी मशीनच्या क्रमांकाची खात्री करून घ्या, अन्यथा मोजणी प्रक्रिया सुरू करू देऊ नका, असे आवाहनही ठाकरे यांनी केले.

आबांचा पराभवांचा वचपा काढा

लोकसभेला असाच उत्साह पाहावयास मिळाला, शाहू छत्रपती यांना मोठ्या मताधिक्याने विजयी केले; पण हातकणंगलेमधून सत्यजीत पाटील-सरुडकर यांचा पराभव झाला. त्या पराभवाचा वचपा काढा, असे आवाहन ठाकरे यांनी केले.

Web Title: Mahavikas Aghadi government work done Maharashtra number one in the country says Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.