Kolhapur Politics: इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत चुरस
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2024 02:13 PM2024-07-11T14:13:43+5:302024-07-11T14:14:56+5:30
काँग्रेसकडून तीन, राष्ट्रवादी एक, तर मॅँचेस्टर आघाडीकडून एक
अतुल आंबी
इचलकरंजी : इचलकरंजीविधानसभा मतदारसंघात उमेदवारीसाठी महाविकास आघाडीमध्ये चुरस निर्माण झाली आहे. काँग्रेस पक्षाकडून तीन, राष्ट्रवादी एक व मँचेस्टर आघाडीकडून एक असे इच्छुक उमेदवार आपापल्या पद्धतीने फिल्डिंग लावत आहेत. यातून कोण बाजी मारणार आणि त्यातून कोणाची नाराजी ओढावणार, याकडे लक्ष लागले आहे.
महाविकास आघाडीत जागा वाटपामध्ये इचलकरंजी विधानसभेची जागा परंपरागत काँग्रेसकडेच राहावी, यासाठी कॉँग्रेसच्या वतीने शशांक बावचकर, राहुल खंजिरे आणि संजय कांबळे यांनी पक्षश्रेष्ठींना विनंती केली आहे. पक्षाने उमेदवारीसाठी सर्वसामान्य वर्गासाठी वीस हजार रुपये आणि मागासवर्गीय व महिला उमेदवारांसाठी दहा हजार रुपये भरून नाव नोंदणीचे आवाहन काँग्रेसने केले आहे. त्याची अंतिम मुदत १० ऑगस्ट २०२४ पर्यंत आहे. त्यानुसार बावचकर, कांबळे आणि गतवेळचे उमेदवार खंजिरे हे तिघे नोंदणी करणार आहेत.
त्यातच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मदन कारंडे यांनी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली असून, आपणच महाविकास आघाडीचा उमेदवार होणार, असा त्यांचा विश्वास आहे. त्यामुळे त्यांच्याकडूनही वरिष्ठ पातळीवर फिल्डिंग लावली जात आहे. आरोग्य शिबिर, मतदार नोंदणी कार्यक्रम या माध्यमांतून त्यांनी जनसंपर्क वाढविण्यास सुरुवात केली आहे. याआधी सन २०१४ साली कारंडे यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना १४ हजार ७९७ मते मिळाली होती.
शहरात कारंडे गट म्हणून स्वतंत्र अस्तित्व असले तरी त्यातील विठ्ठल चोपडे यांच्यासह काही प्रमुख पदाधिकारी बाहेर पडले आहेत. त्यामुळे झालेले गटाचे नुकसान भरून काढण्याचे त्यांच्यासमोर आव्हान आहे. स्थानिक पातळीवरील आघाडीत घटक पक्ष असलेल्या मॅँचेस्टर आघाडीकडून डबल मोक्का कारवाईतून जामिनावर बाहेर आल्यानंतर पुन्हा हद्दपार केलेले संजय तेलनाडे यांनीही उमेदवारीची मागणी केली आहे. या सर्व गोतावळ्यातून उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.
उमेदवारी कोणालाही मिळाली तरी या रस्सीखेचमधून बाहेर पडणारे उमेदवार नाराज होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे उमेदवारी मिळणाऱ्याला सर्व घटक पक्षांना एकसंध ठेवणे, प्रामाणिक प्रचार यंत्रणा राबविण्यासाठी सक्रिय करणे, नाराजी, हेवेदावे निर्माण होऊ नयेत याची दक्षता घेणे, असा सर्व प्रपंच करावा लागणार आहे.
महायुतीतील गुंत्यात चोपडेंची उडी
महायुतीमध्ये आवाडे-हाळवणकर यांच्यातील उमेदवारीचा गुंता सुटत नसताना त्यात घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे यांनी उडी घेतली आहे. अजित पवार गटातून उमेदवारी मागितली आहे. दोघांच्या वादातून हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे द्यावा, अशीही त्यांच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे. त्यामध्ये शाहूवाडी (जनसुराज्य), वाळवा, शिराळा, हातकणंगले व इचलकरंजी (भाजप), शिरोळ (शिंदे गट) अशी प्राथमिक चर्चेतील विभागणी आहे. त्यामुळे अजित पवार गटाला जिल्ह्यात पक्ष वाढीसाठी किमान इचलकरंजी मतदारसंघ द्यावा, अशी मागणी आहे.