कोल्हापूर महापालिकेत सोयीप्रमाणेच होणार महाविकास आघाडी, अडचणी अन् पर्याय जाणून घ्या

By भारत चव्हाण | Published: March 4, 2023 01:32 PM2023-03-04T13:32:54+5:302023-03-04T13:33:26+5:30

विधानसभा, लोकसभा निवडणुकीत शक्य असली तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मात्र थोडी डोकेदुखीची ठरणारी

Mahavikas Aghadi will be held as per convenience in Kolhapur Municipal Elections | कोल्हापूर महापालिकेत सोयीप्रमाणेच होणार महाविकास आघाडी, अडचणी अन् पर्याय जाणून घ्या

कोल्हापूर महापालिकेत सोयीप्रमाणेच होणार महाविकास आघाडी, अडचणी अन् पर्याय जाणून घ्या

googlenewsNext

भारत चव्हाण 

कोल्हापूर : भाजपच्या राजकारणाला शह द्यायचा असेल, तर यापुढील सर्वच निवडणुका एकत्र लढण्याशिवाय पर्याय नाही, याची खात्री पुण्यातील पोटनिवडणुकीतून स्पष्ट झाली आहे; परंतु ही गोष्ट विधानसभा, लोकसभा निवडणुकीत शक्य असली तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मात्र थोडी डोकेदुखीची ठरणारी आहे. ज्या प्रभागात शक्य आहे तेथे महाविकास आघाडी आणि जेथे अशक्य आहे त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती असा प्रयोग आघाडीच्या नेत्यांना करावा लागणार आहे. शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) नेते खासदार संजय राऊत यांनी महापालिका निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढणार असल्याचे गुरुवारी जाहीर केले. त्या अनुषंगाने ते कितपत शक्य आहे, याचा मागोवा घेतला.

कोल्हापूर महानगरपालिकेत महाविकास आघाडीचा पहिला प्रयोग २०१५ रोजी कॉंग्रेसचे आमदार सतेज पाटील व राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनी केला. महापालिकेच्या २०१५ च्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीला ४४ जागा मिळाल्या. भाजप-ताराराणी आघाडीला ३३ जागांवर समाधान मानावे लागले. शिवसेनेला कशाबशा चार जिंकता आल्या होत्या. भाजप-ताराराणी आघाडीने अपेक्षेपेक्षा जास्त जागा जिंकल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीने धोका ओळखला. वर्षभरात भाजपचे नेते फोडाफोडीचे राजकारण करू शकतील म्हणून आपल्यासोबत शिवसेनेच्या चार नगरसेवकांना थेट लाभाची पदे देऊन ओढून घेतले आणि राज्यातील महाविकास आघाडीचा पहिला प्रयोग कोल्हापुरात यशस्वी झाला.

आता देशातील सत्ता भाजपच्या हातात आहे. फोडाफोडी करून राज्यातील सत्ताही हस्तगत केली. भाजपच्या या कपटनीतीला वैयक्तिक पातळीवर स्वतंत्र लढून उत्तर देता येणार नाही, याची खात्री महाविकास आघाडीला झाली आहे. त्याची लिटमस टेस्ट पुण्यातील पोटनिवडणुकीत घेण्यात आली. महाविकास आघाडी एकसंधपणे लढली तर कोणतीही निवडणूक अवघड नाही, हे लक्षात आले आहे. त्यामुळे ‘मविआ’चा प्रयोग स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा, लोकसभा निवडणुकीत केला जाणार आहे; परंतु हा प्रयोग करताना स्थानिक स्वराज्य संस्थेत मोठ्या अडचणी येणार असल्याने तेथे पर्याय शोधावे लागणार आहेत.

काय अडचणी येणार आहेत?

स्थानिक स्वराज्य संस्थांचे मतदार संघ छोटे असतात. प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते फार आधीपासून तयारी करत असतात. प्रभागातून एका-एका पक्षातून दोन-तीन उमेदवार इच्छुक असतात. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षाच्या नेत्यांसमोर एकाची उमेदवारी निश्चित करताना अन्य दोघांना शांत करण्याचे मोठे आव्हान असते. हा एका पक्षाचा प्रयत्न असतो; पण आता महाविकास आघाडी झाल्यावर तीन पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये एकमत करणे, सर्वांचे समाधान करणे केवळ अशक्य होणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची उमेदवारी नाकारलेल्या कार्यकर्त्यांना अन्य पक्षांचे पर्याय सहज उपलब्ध होऊ शकतात.

पर्याय काय आहेत?

  • मविआ म्हणून तिन्ही पक्षांनी एकत्र लढणे हा एक पर्याय आहे; परंतु त्यासाठी तीन पक्षांतील कार्यकर्त्यांमध्ये एकमत करावे लागेल.
  •  मविआ म्हणून जेथे शक्य होईल त्या प्रभागात एकत्रित लढणे, जेथे शक्य होणार नाही त्या प्रभागात मात्र मैत्रीपूर्ण लढणे हा पर्याय असू शकतो.
  • मविआ म्हणून सर्वच प्रभागांत कार्यकर्त्यांमधून एकमत झाले नाही, तर तिन्ही पक्षांनी स्वतंत्र लढणे आणि निवडणुकीनंतर एकत्र येऊन आघाडी करणे. मात्र त्याकरिता निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आपापसांत सामंजस्य राखावे लागेल. हाच पर्याय कोल्हापुरात स्वीकारला जाण्याची शक्यता जास्त आहे.

Web Title: Mahavikas Aghadi will be held as per convenience in Kolhapur Municipal Elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.