महाविकास आघाडी ३० हून अधिक जागा जिंकेल, सुषमा अंधारेंनी केला दावा
By पोपट केशव पवार | Published: April 25, 2024 07:17 PM2024-04-25T19:17:35+5:302024-04-25T19:19:13+5:30
निवडणूक आयोग पक्षपाती
कोल्हापूर : ईडी, सीबीआयसारख्या यंत्रणांचा वापर करुन भाजप आमच्यावर दबाव आणू पाहत आहे. मात्र, ते जितका या यंत्रणाचा वापर करतील तितके लोक अधिक चिडतील असे सांगत शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी महाविकास आघाडी लोकसभा निवडणुकीत राज्यात ३० पेक्षा अधिक जागा जिंकेल असा दावा कोल्हापुरात गुरुवारी पत्रकार परिषदेत केला.
अंधारे म्हणाल्या, ही निवडणूक जनतेनेच हातात घेतली आहे. विदर्भात मतदानाचा टक्का कमी होण्यामागे केवळ उन्हच कारणीभूत नाही तर इव्हीएमही आहे. लोकांच्या मनात इव्हीएमबाबत अद्यापही साशंकता आहे. त्यामुळे आपण दिलेले मतच अपेक्षित उमेदवाराला जाणार नसेल तर ते द्यायचे कशाला या भावनेमुळे मतदान कमी होत असल्याकडे अंधारे यांनी लक्ष वेधले. धर्माच्या, जातीच्या नावावर मते मागण्यापेक्षा विकासकामावर मते मागा, असा सल्लाही त्यांनी महायुतीच्या नेत्यांना दिला. स्मार्ट सिटी, दत्तक गाव योजनेची प्रभावी अंमलबजावणी झाल्याचे ९ उदाहरणे दाखवा असे आव्हान त्यांनी महायुतीला दिले. यावेळी शिवसेना उपनेते संजय पवार, अस्मिता सावंत, हर्षल सुर्वे उपस्थित होते.
अंधारेंनी नोटिशीला पाठवले उत्तर
वर्धा येथील खासदार रामदास तडस यांच्या सूनेने घेतलेल्या पत्रकार परिषदेत अंधारे उपस्थित राहिल्याने राज्याच्या बाल हक्क संरक्षण आयोगाने त्यांना नाेटीस पाठवली. या नोटिशीला मी गुरुवारीच उत्तर पाठवले असल्याचे अंधारे यांनी सांगितले. मला नोटीस मिळालीच पण मी ज्यांना वारंवार फोन करते अशा ५० लोकांनाही का नोटिसा पाठवल्या असा सवाल त्यांनी केला. पक्षाची भूमिका मांडण्यापासून परावृत्त करण्याबरोबरच माझा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोपही त्यांनी केला.
निवडणूक आयोग पक्षपाती
ठाण्यात महायुतीचे नेते पैसे वाटतानाचा व्हिडिओ निवडणूक आयोगाला दिला. बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मतदारांना आकर्षित करणारे वक्तव्य केले तरी आयोगाकडून कारवाई झाली नाही. आम्हाला मात्र त्वरित नोटिसा पाठवल्या जातात. हा पक्षपाती असल्याचा आरोप अंधारे यांनी केला.