LokSabha2024: कोल्हापूर मतदारसंघात सत्तारूढांचे डाव आणि जाणवला शाहूंचा प्रभाव
By समीर देशपांडे | Published: May 8, 2024 01:02 PM2024-05-08T13:02:48+5:302024-05-08T13:05:25+5:30
करवीर, राधानगरी विधानसभा मतदारसंघातील चित्र
समीर देशपांडे
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या मतदानावेळी करवीर आणि राधानगरी तालुक्यांत महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांचा प्रभाव मतदानावेळी जाणवत होता, तर या ठिकाणी सत्तारूढांनी जे डाव खेळले आहेत, त्याचीही चर्चा सुरू होती. ‘प्रभाव’ आणि ‘डाव’ यातील कोणाची सरशी होणार हे ४ जून रोजी स्पष्ट होणार आहे. शाहूंचा हाच प्रभाव कमी करण्यासाठी राधानगरीत महायुतीने शेवटच्या दोन दिवसांत लावलेल्या जोडण्यांमुळे ‘गॅप’ लक्षणीयरित्या कमी होईल, असा दावा काही नेते करत आहेत. त्यातील सत्यता लवकरच कळणार आहे.
सकाळी साडेआठ वाजता कोल्हापुरातून बाहेर पडल्यानंतर करवीर तालुक्यातील वाशीमध्ये पोहोचलो. दोन महिलांना मतदानाबाबत विचारलं. तर म्हणाल्या, ‘बकऱ्यांचं जेवण घेऊन निघालोय, परत आलो की, करणार मतदान’. दोन्ही बाजूंचे बुथ लागलेले. इतक्यात गणपती भिवा बुडके हे १०२ वर्षांचे वृद्ध आले. बोलताना म्हणाले, ‘इंग्रजांच्या काळातले खेळ बगितल्यात कोलापुरात’. वैष्णवी साळुंखे या महाविद्यालयीन विद्यार्थिनीने मात्र बेरोजगारीबाबत चिंता व्यक्त केली.
कांडगाव येथील रंगीबेरंगी शाळेमध्ये मतदान सुरू झालेले. सकाळी ९ वाजता येथील तीन केंद्रांवर सरासरी १२ टक्के मतदान झाले होते. सडोली खालसा इथं फार मोठ्या रांगा नव्हत्या. पाणी आल्यामुळं महिलांची धुणंभांड्यांची लगबग सुरू होती. हळदीमध्ये एक मृत झाल्याने दोन, तीन गल्लीतील कार्यकर्ते, मतदार अंत्यसंस्काराच्या कामात होते. परित्याच्या दसरा चौक तरुण मंडळाच्या मंडपात कार्यकर्त्यांनी ठिय्या मारलेला. हात जोडायचे, पाया पडायचे सुरू होते.
राशिवड्यात एका नागरिकाशी बोललो, तर त्यांनी ‘ही निवडणूक जनतेनं हातात घेतलीय’, एवढेच सूचक वाक्य उच्चारले. घोटवड्यात शाळेत मतदान सुरू होते. दुसरीकडे बल्क कुलर युनिटवर खुर्ची टाकून बसले होते. आकनूर इथं मतदान केंद्रांवर महिलांनी हू म्हणून गर्दी केली होती. साहजिकच त्यांच्या गप्पाही सुरू होत्या. त्यामुळे वर्गखोलीत एकमेकांना काही ऐकू येईना. घरातील सगळी कामं आवरून महिला मतदानासाठी आल्या होत्या. सरवड्यात राधानगरीच्या शिष्यवृत्तीतील यशाची कल्पना राबवून मतदान केंद्रांवर कमानी उभारण्यात आल्या होत्या.
बातम्यांचे फ्लेक्स लावण्यात आले होते. एका मावशींना विचारलं, उमेदवाराचे नाव लक्षात ठेवता का चिन्ह. त्या म्हणाल्या, आम्ही शिकलाव. त्यामुळं दोन्हीबी लक्षात येतंय. सव्वा अकरापर्यंत सरवड्यात सरासरी २८ टक्के मतदान झाले होते. वैद्यकीय अधिकारी आशा कर्मचाऱ्यांना सूचना देत होत्या.
गारगोटीतील श्री शाहू कुमार भवन इथल्या दाेन केंद्रांवर सरासरी ३७ टक्के मतदान झाले होते. आमदार प्रकाश आबिटकर भुदरगड तालुक्यातील काही गावांना भेटी देऊन घरी आले होते. उत्तुरात दुपारी दीडच्या दरम्यान वसंतरावदादा पाटील विद्यालय आणि कुमार, कन्या उत्तूर येथील मतदानाचा वेग संथ झाला होता. गडहिंग्लजच्या एम. आर. हायस्कूलच्या प्रवेशद्वारावर स्वाती कोरी उभ्या होत्या. मतदारांना आवाहन करत होत्या. या ठिकाणी दुपारी अडीचपर्यंत ४२ टक्के मतदान झाले होते.
ओआरएस, औषध गोळ्यांचीही उपलब्धता
वाढते ऊन लक्षात घेऊन प्रशासनाने मतदान केंद्रांवर पाण्याची सोय केली होती, तसेच आरोग्य विभागाच्या सहकार्याने ओआरएस, औषध गोळ्या ठेवण्यात आल्या होत्या. आरोग्य विभागाचे कर्मचारी अधूनमधून पाणी प्या, असे नागरिकांना सांगत होते.
मराठवाड्यातील होमगार्ड
इकडच्या मतदार केंद्रावर मराठवाड्यातील होमगार्डची नियुक्ती करण्यात आली आहे. तिकडचे मतदान पुढच्या टप्प्यात असल्याने या सर्वांना कोल्हापूर जिल्ह्यात नेमण्यात आले आहे.
एकीकडे धुरे, मध्ये व्हनबट्टे, दुसरीकडे आपटे
उत्तुरात राष्ट्रवादीचे वसंतराव धुरे मुख्य रस्त्यावर बेरजा मारत होते, तर सदानंद व्हनबट्टे मतदारांसाठीच्या मंडपात बसून होते, तर उमेश आपटे शाळेच्या पाठीमागच्या बाजूला होते. पालकमंत्री हसन मुश्रीफ नुकतेच येऊन गेलेले. धुरे म्हणाले, ‘साहेबांंसाठी म्हणून करायचं.’