गडहिंग्लजमध्ये जनता दलाच्या विरोधात महाविकास आघाडी शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:25 AM2021-08-23T04:25:26+5:302021-08-23T04:25:26+5:30

गडहिंग्लज : गडहिंग्लज नगरपालिकेत सत्ताधारी जनता दल विरूद्ध महाविकास आघाडी असाच सामना यावेळी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जनता दलासमोर ...

Mahavikas lead against Janata Dal in Gadhinglaj | गडहिंग्लजमध्ये जनता दलाच्या विरोधात महाविकास आघाडी शक्य

गडहिंग्लजमध्ये जनता दलाच्या विरोधात महाविकास आघाडी शक्य

Next

गडहिंग्लज : गडहिंग्लज नगरपालिकेत सत्ताधारी जनता दल विरूद्ध महाविकास आघाडी असाच सामना यावेळी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जनता दलासमोर सत्ता अबाधित राखण्याचे तर विरोधी महाआघाडीचे नेतृत्व राहणाऱ्या राष्ट्रवादीसमोर सत्ता काबीज करण्याचे आव्हान राहील, असेच आजचे चित्र आहे.

गेल्यावेळी सत्ताधारी जनता दलाच्या विरोधात राष्ट्रवादी, भाजपा-शिवसेना युती असा तिरंगी सामना झाला होता. त्यात थेट नगराध्यक्षपदासह ११ जागा जिंकून ‘जद’ने बाजी मारली होती. राष्ट्रवादीला ४ , भाजपाला २ तर शिवसेनेला १ जागा मिळाली होती.

तथापि, निवडणुकीनंतर राज्यात त्यावेळी सत्तेत असणाऱ्या भाजपा-सेनेने गडहिंग्लज पालिकेच्या सत्तेत जाण्यासाठी ‘जद’बरोबर आघाडी केली. त्यामुळे युतीला ५ वर्षे महिला बालकल्याण समितीचे सभापतीपद मिळाले. परंतु, जनता दलाला आणि ‘युती’च्या नगरसेवकांनाही राज्यातील सत्तेचा काहीच उपयोग झाला नाही.

दरम्यान, हद्दवाढीमुळे अस्तित्वात आलेल्या नव्या प्रभाग नऊची निवडणूक जनता दल व राष्ट्रवादीने एकत्र लढवली. त्यांच्याविरोधात लढलेल्या ‘भाजप-मनसे’ आघाडीचा दारूण पराभव झाला. त्यानंतर ‘जद’ आणि राष्ट्रवादीचे सभागृहातील संख्याबळ प्रत्येकी एकाने वाढले.

तथापि, विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र आलेल्या जनता दल आणि राष्ट्रवादीमध्ये गडहिंग्लज कारखाना व पालिकेतील राजकारणातून मोठी दरी निर्माण झाली आहे. त्यामुळेच यावेळीही प्रामुख्याने जनता दलाविरूद्ध राष्ट्रवादी असाच पारंपरिक सामना होण्याची चिन्हे आहेत.

नगरपालिकेत राष्ट्रवादीची सत्ता नसतानाही मंत्री हसन मुश्रीफ यांनी शहरातील विकासकामांसाठी १३ कोटींचा निधी दिला असून त्या आधारेच सत्तेची संधी मागितली जाणार आहे.

------------------------

राष्ट्रवादी बांधणार महाआघाडीची मोट !

जनता दलातील ‘नाराज’ मंडळींसह काँग्रेस-शिवसेना व मनसे अशी महाआघाडीची मोट बांधण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. तसेच झाल्यास जनता दल व भाजपा हे एकत्र येऊ शकतात.

----------------------

सभागृहातील सध्याचे बलाबल..!

जनता दल- १३, राष्ट्रवादी- ६, शिवसेना-१, भाजपा - ०

------------------------

घडले-बिघडले..!

गेल्या निवडणुकीत भाजपाकडून निवडून आलेल्या शशिकला पाटील यांनी जनता दलात तर दीपक कुराडे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

- गेल्यावेळची थेट नगराध्यक्ष निवडणूक राष्ट्रवादीतर्फे लढवलेले रमेश रिंगणे यांनी भाजपामध्ये तर भाजपातर्फे लढलेले वसंत यमगेकर हे स्वगृही राष्ट्रवादीत परतले आहेत.

------------------------

५ वर्षांतील ठळक कामे

योगाभवन व दिनकरराव शिंदे मास्तर शाळा इमारत बांधकाम, पॅव्हेलियनमध्ये अत्याधुनिक व्यायामशाळा व खुल्या जागेत ओपन जीमची सुविधा, ज्येष्ठ नागरिक व सेवानिवृत्तांसाठी सभागृह, नदीघाट सुशोभिकरण, विद्यार्थ्यांसाठी सायन्स सेंटर व नवोदित कलाकारांसाठी कला अकादमी सुरू करण्यात आली आहे. स्वच्छ भारत सर्वेक्षण स्पर्धेतील यशामुळे पालिकेला साडेबारा कोटीची बक्षिसे मिळाली आहेत.

------------------------

१३४ वर्षांची नगरपालिका

स्थापना : १ ऑगस्ट १८८७ वार्षिक उत्पन्न : ४ कोटी

लोकसंख्या : ३२६२२ एकूण मतदार : २७ हजार

एकूण वाॅर्ड : १९ नगरसेवक संख्या : १९ ------------------------

गडहिंग्लज नगरपालिका : २१०८२०२१-गड-०६

उद्याच्या अंकात जयसिंगपूर

Web Title: Mahavikas lead against Janata Dal in Gadhinglaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.