शिरोळमध्ये महाविकास आघाडीने जिंकून दाखविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:25 AM2021-01-19T04:25:45+5:302021-01-19T04:25:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शिरोळ : शिरोळ तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीत बारा गावांमध्ये सत्तांतर झाले तर पंधरा गावांमध्ये सत्ताधाऱ्यांनी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरोळ : शिरोळ तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीत बारा गावांमध्ये सत्तांतर झाले तर पंधरा गावांमध्ये सत्ताधाऱ्यांनी पुन्हा गड राखला. तीन गावांमध्ये त्रिशंकू तर तीन गावात आघाड्यांना संमिश्र यश मिळाले. एकूणच नेत्यांनी पक्षापेक्षा वेगवेगळ्या ठिकाणी सोयीच्या स्थानिक आघाड्या केल्यामुळे अनेक ठिकाणी महाविकास आघाडीचे वर्चस्व राहिल्याचे चित्र आहे.
शिरदवाडसह, दत्तवाड, जुने दानवाड या गावांमध्ये त्रिशंकू चित्र निर्माण झाले आहे. तर बुबनाळ, निमशिरगाव, तमदलगे या गावांमध्ये आघाड्यांना संमिश्र यश मिळाले आहे. उदगावमध्ये स्वाभिमानीने बालेकिल्ला राखला तर धरणगुत्तीमध्ये ग्रामविकास आघाडीला एकहाती सत्ता मिळाली. दानोळीमध्ये काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सर्जेराव शिंदे यांच्या सत्ताधारी आघाडीचा धुव्वा उडाला.
येथील मध्यवर्ती प्रशासकीय सभागृहात तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अपर्णा मोरे यांच्या अध्यक्षतेखाली एकूण वीस टेबलवर तेरा फेऱ्यांव्दारे मतमोजणी झाली. निवडणूक विभागाकडून निकाल जाहीर होण्यापूर्वीच कार्यकर्त्यांना निकाल समजू लागल्याने विजयी समर्थकांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला. जवळपास २७ गावांमध्ये आपल्या गटाचे समर्थक विजयी झाल्याचा दावा यड्रावकर गटाने केला आहे. एकूणच सरपंच आरक्षणावर सत्तेची गणिते ठरणार आहेत.
............
या गावांमध्ये सत्तांतर
बस्तवाड, गौरवाड, कुटवाड, दानोळी, नांदणी, कोंडिग्रे, आलास, घोसरवाड, टाकळीवाडी, यड्राव, तेरवाड, जैनापूर.
..............
या गावात सत्ताधारी कायम
हसूर, गणेशवाडी, उदगाव, नृसिंहवाडी, धरणगुत्ती, जांभळी, अर्जुनवाड, घालवाड, शिरटी, मजरेवाडी, चिपरी, कवठेगुलंद, शिरढोण, शेडशाळ.
................
चिठ्ठीवर ठरले बहुमत
शिरढोणमध्ये सतरा जागांसाठी निवडणूक झाली. शाहू आघाडी व गुरुदत्त आघाडीला प्रत्येकी आठ जागा मिळाल्या. तर एक जागेवर समान मते मिळाली. त्यानंतर चिठ्ठी पध्दतीने झालेल्या निकालात चंद्रकांत चव्हाण विजयी ठरल्याने शाहू आघाडीला बहुमत मिळाले.
............
चिठ्ठीवर उमेदवार विजयी
शिरटी येथे यास्मीन मुल्लाणी व सावित्री भुवण्णावर, कवठेगुलंद येथे ऋषिराज शिंदे व बाबगोंडा यांना समान मते मिळाली. त्यामुळे विद्यार्थी संतोषी आंबेकर व यश पाटील यांच्या हस्ते चिठ्ठी काढल्यानंतर भुवण्णावर व पाटील विजयी ठरले. तर शिरढोण प्रभाग दोन मधून ललिता जाधव व दानोळी प्रभाग चारमधून कल्पना पिसे एका मतांनी विजयी झाल्या.