CoronaVirus Lockdown : महावीर सेवा ट्रस्टचे रुग्णालय ठरतेय सामान्य रुग्णांसाठी आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2020 05:25 PM2020-04-04T17:25:27+5:302020-04-04T17:41:55+5:30
येथील छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात विशेष कोरोना कक्ष स्थापन केल्यामुळे नियमित तपासणीसाठी आणि उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची हेळसांड होत आहे. कसबा बावड्याच्या सेवा रुग्णालयात सेवा सुरू असली तरी शहरातील खासगी दवाखाने अद्यापही बंदच असल्याने नियमित रुग्ण बाजार गेट येथील महावीर सेवा धाम ट्रस्टच्या रुग्णालयाकडे धाव घेत आहेत.
कोल्हापूर : येथील छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात विशेष कोरोना कक्ष स्थापन केल्यामुळे नियमित तपासणीसाठी आणि उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची हेळसांड होत आहे. कसबा बावड्याच्या सेवा रुग्णालयात सेवा सुरू असली तरी शहरातील खासगी दवाखाने अद्यापही बंदच असल्याने नियमित रुग्ण बाजार गेट येथील महावीर सेवा धाम ट्रस्टच्या रुग्णालयाकडे धाव घेत आहेत.
कोरोना विषाणुशी संबंधित रुग्णांवरच लक्ष केंद्रित केल्यामुळे सामान्य रुग्णांची हेळसांड होत आहे. कसबा बावडा येथील सेवा रुग्णालय जरी सुरू असले तरी ते शहरापासून दूर असल्याने मध्यवस्तीतील महावीर सेवा धाम ट्रस्टच्या सेवार्थ रुग्णालयाचा सामान्य रुग्णांना आधार वाटत आहे.
महावीर ट्रस्टच्या या सेवा रुग्णालयात १ एप्रिलपासून बाह्य रुग्ण विभाग सुरू ठेवण्यात आला आहे. रोज सकाळी ८ ते २ या वेळेत हा विभाग सुरू असून, यासाठी वीस रुपये इतकीच तपासणी फी आकारली जाते. याशिवाय येथील अद्ययावत प्रयोगशाळेत रोज सकाळी १० ते १ या वेळेत सर्व प्रकारच्या तपासण्याही अत्यंत माफक दरात करण्यात येत आहेत.
या रुग्णालयात डॉ. मयूरेश पाटील, डॉ. अभिजित पाटील आणि डॉ. विजया खोत हे नियमित सेवा देत आहेत. ट्रस्टने त्यांच्यासाठी या काळात खास संरक्षक किटचीही व्यवस्था केली आहे. याशिवाय बाह्य रुग्ण विभागात सध्या चार कर्मचारी आणि प्रयोगशाळेत एका तंत्रज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांसह तीन कर्मचारी सेवेत आहेत.
या रुग्णालयात २ एप्रिल रोजी १७, ३ एप्रिल रोजी १९ आणि ४ एप्रिल रोजी ३८ रुग्णांची नोंद झाली आहे. सर्दी, ताप, खोकला यासह रक्तदाब, मधुमेही रुग्णांचा यामध्ये समावेश आहे. याशिवाय रक्तातील साखर, लिपिड प्रोफाईल यासारख्या नियमित चाचण्याही प्रयोगशाळेत होत आहेत.
सामाजिक अंतर ठेवून रुग्णांचा वैद्यकीय इतिहास नोंदवून त्यांची तपासणी करून योग्य उपचारासह मोफत औषध दिले जाते. ‘कोरोना’शी संबंधित लक्षणे दिसताच त्यांना सीपीआरमध्ये जाण्याचा सल्ला दिला जातो तसेच योग्य ते समुपदेशनही येथे केले जाते.
डॉ. विजया खोत
वैद्यकीय अधिकारी,
महावीर सेवा धाम ट्रस्टचे सेवार्थ रुग्णालय, बाजारगेट, कोल्हापूर.