Kolhapur: वेदगंगा नदीला पूर, जीव धोक्यात घालून महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वीज पुरवठा केला सुरळीत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2023 04:38 PM2023-07-24T16:38:43+5:302023-07-24T16:39:03+5:30
एक किलोमीटर महापुरात जाऊन सुमारे अर्धा तास पाण्यामध्ये राहत बिघाड शोधून वीज पुरवठा सुरळीत केला
अनिल पाटील
मुरगूड : वेदगंगा नदीला आलेल्या महापुरामुळे अनेक ठिकाणी बिघाड निर्माण झाल्याने मुरगूड शहरासह परिसरातील काही गावांचा वीज पुरवठा खंडित झाला होता. मुरगूड महावितरण कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालून महापुरात उड्या मारून अगदी नदीच्या काठावर जात बिघाड शोधून वीज पुरवठा सुरळीत केला. या कर्मचाऱ्यांच्या धाडसाचे कौतुक होत आहे.
मुरगूड चिमकाई ११ केव्ही फीडर मध्ये बिघाड झाल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता. यावेळी सेवेवर असणारे शहाजी खतकर, भिकाजी चौगले, सतीश रणवरे, वैभव लोंढे, सागर गुजर यांनी तात्काळ हा बिघाड शोधला पण परत लाइन सिंगल फेज झाल्याने नदी काठावर जाऊन जम्प मारणे गरजेचे होते. अन्यथा मुरगूड शहरासह परिसरातील काही गावे अंधारात राहणार होती. त्यामुळे या पाच ही जणांनी महापुरात जाण्याचा निर्णय घेतला.
मुरगूड नगरपालिकेकडून लाइफ जॅकेट घेऊन रस्सीच्या सहाय्याने सुमारे एक किलोमीटर महापुरात जाऊन सुमारे अर्धा तास पाण्यामध्ये रहात हा बिघाड शोधून या कर्मचाऱ्यांनी वीज पुरवठा सुरळीत केला. नदीचा वेगाने वाहणारा प्रवाह आणि कोसळणारा पाऊस यामध्ये जात आपले कर्तव्य पार करणाऱ्या या बहाद्दर कर्मचाऱ्यांचे उपस्थितांनी कौतुक केले. सद्या शहरातील वीज पुरवठा सुरळीत आहे.