चार तास फोर्स लोडशेडिंग, शेतकऱ्यांना होतोय ताप; महावितरणचे अधिकारी म्हणतात.. 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2023 12:29 PM2023-06-19T12:29:40+5:302023-06-19T12:30:04+5:30

मागील तीन-चार महिन्यांपासून रात्री आणि दिवसाही जेमतेम चार-पाच तासांची वीज मिळत आहे

Mahavitaran imposed unfair 4 hour force load shedding on agriculture | चार तास फोर्स लोडशेडिंग, शेतकऱ्यांना होतोय ताप; महावितरणचे अधिकारी म्हणतात.. 

चार तास फोर्स लोडशेडिंग, शेतकऱ्यांना होतोय ताप; महावितरणचे अधिकारी म्हणतात.. 

googlenewsNext

सतीश पाटील

शिरोली : महावितरण कंपनीने शेतीला अन्यायकारक ४ तासांचे फोर्स लोडशेडिंग लादल्याने, शेतकऱ्यांच्या पिकांना झटका बसून शेतकऱ्यांच्या गळ्याला फास लागायची वेळ आली आहे. फोर्स लोडशेडिंग हे अधिकृत नसून ते शेतकऱ्यांवर लादलेले आहे, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

रात्रीचा शेतकरी पाणी पाजवण्यासाठी शेतात जातो आणि पाणी सुरू असताना अचानक वीज गायब होते. ती कधी येईल, हे कंपनीचे कर्मचारीच काय अधिकारीही सांगू शकत नाहीत. मुंबईमध्ये महावितरणचे संपूर्ण राज्याचे सेंटर आहे तिथून हे फोर्स लोडशेडिंग केलं जातं. तेच ठरवतात लोडशेडिंगबाबत, याला कोणतेही अध्यादेश नाहीत. पण, विजेचा अधिक भार वाढला की, हे लोडशेडिंग केलं जातं, असे महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

गेल्या तीन महिन्यांपासून महावितरण कंपनीने शेतीला फोर्स लोडशेडिंग सुरू केले आहे. त्यामुळे पिके वाळली आहेत. पूर्वी लोडशेडिंगमध्ये वीज कधी जाणार, कधी येणार याचे वेळापत्रक किंवा मेसेज यायचे. मात्र, ‘फोर्स लोडशेडिंग’मध्ये कधीही वीज जाते आणि कधीही येत असल्याने त्याचा फटका बसत आहे. जास्तकरून रात्रीच्या वेळी हे लोडशेडिंग केले जाते. अचानकच वीज खंडित होते. आठ तासांपैकी चार - पाच तासच वीज मिळते.

कृषी पंपाला आठवड्यातील तीन दिवस रात्रीची आणि चार दिवस दिवसा आठ तास वीज दिली जाते. परंतु, मागील तीन - चार महिन्यांपासून रात्री आणि दिवसाही जेमतेम चार - पाच तासांची वीज मिळत आहे. शेतकरी रात्री पाणी पाजण्यासाठी शेतात जातो आणि पाणी सुरू असताना अचानक वीज गायब होते. ती कधी येईल, हे कंपनीचे कर्मचारीच काय अधिकारीही सांगू शकत नाहीत.

सध्या पिकांना पाण्याची आवश्यकता जास्त आहे. त्यामुळे फोर्स लोडशेडिंग शेतीला नुकसानकारक आहे. विजेमुळे पाण्याची टंचाई झाल्याने पिके करपून गेली आहेत. शेतकरी कर्जबाजारी होईल. - बाबासाहेब देवकर, सडोली, शेतकरी)
 

फोर्स लोडशेडिंग हे संपूर्ण महाराष्ट्रात लागू केले जाते. वीज घालवण्यासाठी मुंबई कार्यालयावरून अचानक सूचना येतात आणि वीज खंडित करावी लागते. त्याची वेळ व काळ आम्हाला माहीत नसते. आमच्या हातात काहीच नाही. -पी. एल. माशाळ, कार्यकारी अभियंता, महावितरण)

फोर्स लोडशेडिंग हे अधिकृत नसून ते शेतकऱ्यांवर लादलेले आहे. याला कोणताही अर्थ नाही. महावितरण कंपनीकडे वीज तुटवडा नाही. मुबलक वीज असताना शेतकऱ्यांची पिळवणूक करण्याचे काम करत आहेत. -प्रताप होगाडे, अध्यक्ष, महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना)

Web Title: Mahavitaran imposed unfair 4 hour force load shedding on agriculture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.