शाहू ब्लड बँकेकडून मानवतेचा महायज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:20 AM2021-07-17T04:20:07+5:302021-07-17T04:20:07+5:30

कोल्हापूर : गेली ४५ वर्षे रक्तदानाच्या माध्यमातून राजर्षी शाहू ब्लड बँकेने मानवतेचा महायज्ञ सुरू ठेवला आहे, असे गौरवोद्गार आरोग्यमंत्री ...

Mahayagya of Humanity from Shahu Blood Bank | शाहू ब्लड बँकेकडून मानवतेचा महायज्ञ

शाहू ब्लड बँकेकडून मानवतेचा महायज्ञ

Next

कोल्हापूर : गेली ४५ वर्षे रक्तदानाच्या माध्यमातून राजर्षी शाहू ब्लड बँकेने मानवतेचा महायज्ञ सुरू ठेवला आहे, असे गौरवोद्गार आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी येथे काढले.

येथील शाहू ब्लड बँकेच्या नूतन वास्तू स्थलांतर समारंभात ते बाेलत होते. अध्यक्षस्थानी शाहू छत्रपती होते. यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आमदार ऋतुराज पाटील प्रमुख उपस्थित होते.

आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, या रक्तपेढीने काळानुरूप बदल केले. रुग्णांच्या गरजा ओळखल्या. नवीन तंत्रज्ञान आत्मसात केले. व्यावसायिक पध्दतीचा अवलंब न करता सेवाभावी वृत्तीने त्यांनी हे काम केले हे या रक्तपेढीचे वेगळेपण आहे. संस्थेचे अध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी रक्तपिशवीचा आकार, खासगी रक्तपेढ्यांच्या किमतींवर नियंत्रण यासह अन्य ज्या काही सूचना केल्या आहेत. त्याचा निश्चितच विचार केला जाईल. संबंधित यंत्रणांशी बोलून याबाबत निर्णय घेतले जातील.

मंत्री मुश्रीफ म्हणाले, रक्तदानाची गरज ही कोरोना काळामध्ये अधोरेखित झाली आहे. आरोग्यक्षेत्रात रक्तदान करून देवदूताचे काम करणाऱ्या सर्वांनाच मी सलाम करतो. कोरोना काळात गेल्यावर्षीपासून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि आरोग्यमंत्री टोपे यांनी अतिशय उत्तम काम करून दाखवले. जिल्ह्यात कोरोनाचे प्रमाण अधिक असून याच प्रमाणात आम्हाला लस मिळायला हवी.

संस्थेचे अध्यक्ष व्ही.बी. पाटील म्हणाले, ज्यावेळी रक्तदान करायला कोणीही सहजासहजी तयार होत नसे. ज्यावेळी मिरज, पुणे आणि मुंबईहून काचेच्या बाटल्यांमधून रक्त आणावे लागत होते. तेव्हा जिल्ह्यातील रुग्णांची गरज ओळखून रोटरी सामाजिक सेवा केंद्र, शेतकरी संघ आणि इंडियन रेड्रकॉस यांनी मिळून ही रक्तपेढी सुरू केली. रोटरी इंटरनॅशनने दिलेल्या सात कोटीच्या निधीमुळे ही रक्तपेढी चांगले काम करू शकली. कोरोना आणि महापूर काळात कोल्हापूर जिल्ह्यातील गरजू रुग्णांना माेफत रक्तपुरवठा केला. खासगी संस्थांना रक्तसंकलनाची परवानगी दिल्यानंतर या क्षेत्रात व्यावसायिकपणा वाढला. कोल्हापुरात रक्त गोळा करून पुण्या-मुंबईला चार, पाच हजारला बॅग विकण्याचे प्रकार सुरू आहेत यावर शासनाचे नियंत्रण आवश्यक आहे. या स्थलांतर कामामध्ये आरोग्यमंत्री टोपे आणि खासदार संभाजीराजे यांनी सहकार्य केल्याचेही पाटील यांनी नमूद केले.

अनेकांना जीवनदान देण्याची कामगिरी या संस्थेच्या माध्यमातून करण्यात आली आहे. कोल्हापूरसाठी हे अभिमानास्पद असल्याचे शाहू छत्रपती यांनी सांगितले. रोटरी समाजसेवा केंद्राचे राजेंद्र देशिंगे यांनी आभार मानले. अमित माटे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी शेतकरी संघाचे अध्यक्ष गणपतराव पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, उद्योजक व्ही. एन. देशपांडे, नितीन वाडीकर, प्रताप पुराणिक, राजीव परीख, राजू दोशी, साधना घाटगे, महेेंद्र परमार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, ए. वाय. पाटील, आर. के. पोवार, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

चौकट

व्ही. बी. यांचे काैतुक

मंत्री टोपे यावेळी व्ही. बी. पाटील यांचे ताेंडभरून कौतुक केले. व्यवसाय, सहकार, उद्योग, राजकारण, समाजकारण अशा विविध क्षेत्रात कार्य करणारे व्ही. बी. पाटील हे या संस्थेचे चौफेर दृष्टी असलेले अध्यक्ष आहेत. आपल्या वडिलांपासून त्यांचे ऋणानुबंध आहेत असे टोपे यांनी सांगितले.

चौकट

यांचा झाला सत्कार

यावेळी अधिकवेळा रक्तदान करणारे, इमारत उभारणारे आणि कंपन्यांमध्ये रक्तदान शिबिरे घेणारे राजू लिन्सवाला, वसंतराव चव्हाण, रवीद्र जाधव, मिथुन सात्रा, अभिजित बुधले, अभिजित कानेटकर, चिन्मय कागलकर, शैलेश देशपांडे, पाटीदार समाज, घाटगे पाटील उद्योग, मेनन पिस्टन, वसंतराव चौगुले पतसंस्था, इंद्रजित नागेशकर, हर्षद तांदळे, मनीष मिश्रा, अतुल इंगवले, यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

१६०७२०२१ कोल शाहू ब्लड बँक ०१

कोल्हापूर येथील राजर्षी शाहू ब्लड बँकेच्या स्थलांतर कार्यक्रमात आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि शाहू छत्रपती यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी डावीकडून राजेद्र देशिंगे, ब्लड बँकेचे अध्यक्ष व्ही. बी. पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, आमदार ऋतुराज पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण उपस्थित होते. (छाया- आदित्य वेल्हाळ)

Web Title: Mahayagya of Humanity from Shahu Blood Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.