युतीच्या प्रतिसादानंतरच ‘महायुती’
By admin | Published: July 26, 2014 12:09 AM2014-07-26T00:09:12+5:302014-07-26T00:17:15+5:30
विधानसभेची रणनीती : राजू शेट्टी यांची भूमिका
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुती आकारास आली, कारण त्यावेळी जागा मर्यादित होत्या. परंतु विधानसभा निवडणुकीत २८८ जागा असल्याने शिवसेना-भाजपचा प्रतिसाद कसा मिळतो, यावरच महायुती आकारास येणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भूमिका जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला असता ते बोलत होते.
शेट्टी यांनी सांगितले, ‘महायुतीबाबत यापूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्याशी दोन-तीनवेळा बोलणे झाले आहे. आज मुंबईत शिवसेना व भाजपची बैठक झाली. युतीचा गेल्या पंधरा वर्षांतील जागा वाटपाचा फॉर्म्युला बदलावा, अशी मुख्यत: भाजपची मागणी आहे. त्यांना लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळाल्याने वाढीव जागा हव्या आहेत. त्यामुळे कुणी किती जागा लढवायच्या हे या दोन पक्षांत ठरल्याशिवाय पुढे जाता येत नाही. त्यांच्या जागा निश्चित झाल्यावर या दोन पक्षांनी स्वाभिमानी, रासप व आठवले गटाला किती जागा सोडायच्या याचा निर्णय होईल. या दोन पक्षांची त्यासंदर्भात आज प्राथमिक चर्चा झाली आहे. परंतु त्याचा तपशील समजलेला नाही. त्यांच्याकडून काय प्रस्ताव येतो हे समजल्यावरच आमची रणनीती ठरवू. आम्ही पक्ष म्हणून विधानसभेसाठी किती जागा हव्यात, याची मागणी अद्याप या पक्षांकडे केलेली नाही. परंतु आम्ही स्वबळावर लढायचेच झाल्यास किती जागांवर लढू शकू याची चाचपणी करून ठेवली आहे. त्यानुसार राज्यांतील किमान ६५ आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पाच जागांवर लढण्याची तयारी आहे. त्यासंदर्भातील चाचपणी म्हणूनच उद्या, शनिवारी कोल्हापुरात व रविवारी (दि.२७) गारगोटी (ता. भुदरगड) येथे ‘स्वाभिमानी’चा मेळावा होत आहे. (प्रतिनिधी)