दोन्ही काँग्रेसविरोधात महायुती
By admin | Published: June 8, 2015 12:23 AM2015-06-08T00:23:42+5:302015-06-08T00:52:48+5:30
बाजार समिती निवडणूक : गोकुळ, केडीसीसीतील समझोता एक्स्प्रेस कायम
कोल्हापूर : बाजार समितीच्या निवडणुकीत कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेस-जनसुराज्य आघाडी व महायुती यांच्यातच सामना रंगणार हे जवळपास निश्चित आहे. ‘गोकुळ’, जिल्हा बॅँकेपाठोपाठ दोन्ही कॉँग्रेसची समझोता एक्स्प्रेस बाजार समितीतही धावण्याची शक्यता आहे. शिवसेना, भाजप, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने स्वतंत्र अर्ज दाखल केले असले तरी शेवटच्या क्षणी महायुती एकत्रच येणार. इतर पक्ष व नाराजांना सोबत घेऊन दोन्ही कॉँग्रेसना तगडे आव्हान देण्याची त्यांनी तयारी केली आहे.
समितीच्या राजकारणात ज्या पक्षाचे विकास सेवा संस्था व ग्रामपंचायतींवर प्राबल्य, त्याच पक्षाचे समितीवर वर्चस्व असते. सात वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत कॉँग्रेस व राष्ट्रवादी-जनसुराज्य आघाडी झाली. ही निवडणूक विभाजनाच्या मुद्द्यावरून चांगलीच रंगली.
निवडणूकच होऊ नये, यासाठी कॉँग्रेसने शर्थीचे प्रयत्न केले. त्यातून आठशे उमेदवार रिंगणात राहिले होते. या निवडणुकीत राष्ट्रवादी आघाडीने बाजी मारली; पण दोन वर्षांपूर्वी संचालक मंडळाच्या गलथान कारभारामुळे संचालक मंडळ बरखास्त होऊन प्रशासक आले. या पार्श्वभूमीवर ही निवडणूक होत आहे. त्यात ‘गोकुळ’च्या निवडणुकीपासून जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. सहकारी संस्था पातळीवर दोन्ही कॉँग्रेसमध्ये सामना व्हायचा; पण राज्य व केंद्रातील सत्ता गेल्याने दोन्ही कॉँग्रेसने सावध भूमिका घेतली आहे. प्रत्येकाने आपापली संस्थाने ताब्यात ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ‘गोकुळ’ व जिल्हा बॅँकेत समझोता झाला. समिती निवडणुकीत हा समझोता कायम राहणार का, याबाबत कार्यकर्त्यात संभ्रमावस्था आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपत आली तरी आघाडीबाबत दोन्ही कॉँग्रेसच्या पातळीवर चर्चा नाही. त्यात राष्ट्रवादीने जनसुराज्यसोबतची आघाडी कायम ठेवत जोरदार तयारी केली आहे.
करवीर, पन्हाळा, शाहूवाडी, गगनबावडा, राधानगरी, भुदरगड व निम्मा कागल असे समितीचे साडेसहा तालुक्यांचे कार्यक्षेत्र येते. करवीर व राधानगरी सोडली तर उर्वरित ठिकाणी कॉँग्रेसची उमेदवार उभे करण्याइतपत ताकद नाही. त्यामुळे राष्ट्रवादीने आघाडीबाबत फारसा आग्रह धरलेला नाही. पन्हाळा, शाहूवाडीत जनसुराज्य पक्षाची पकड आहे. राधानगरी, भुदरगड व कागलमध्ये राष्ट्रवादीची ताकद असल्याने एवढ्या ताकदीवर समितीचे मैदान सहज मारता येऊ शकते, असे राष्ट्रवादीच्या नेत्यांना वाटते.
तरीही आघाडी धर्म कायम ठेवण्यासाठी कॉँग्रेससाठी चर्चेचे दरवाजे खुले ठेवले आहेत. करवीर व राधानगरीमधील काही जागा कॉँग्रेसला देण्यावर एकमत होण्याची शक्यता आहे. आज, सोमवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस आहे. शनिवार (दि. १३) पर्यंत माघारीची मुदत असल्याने येत्या आठ दिवसांत पॅनेलच्या हालचाली गतिमान होणार आहेत. (प्रतिनिधी)
‘शेकाप’ विरोधी आघाडीत ?
जिल्हा परिषदेसह सर्वच निवडणुकांत राष्ट्रवादीचा पारंपरिक मित्रपक्ष असलेला शेतकरी कामगार पक्ष या निवडणुकीत काहीसा बाजूला पडण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीपासून राष्ट्रवादी व शेकापमधील संबंध ताणले आहेत. जनसुराज्यबरोबर आघाडी करताना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शेकापशी चर्चाही केलेली नाही. त्यामुळे शेकापच्या नेत्यांनी सावध भूमिका घेत आपले अर्ज दाखल केले आहेत. राष्ट्रवादीबरोबर कॉँग्रेस गेले तर शेकाप महायुतीबरोबर जाणार हे निश्चित आहे.
कॉँग्रेससोबत आघाडीची चर्चा झालेली नाही; पण आम्ही सकारात्मक आहोत. आज, सोमवारनंतर याबाबत निश्चित निर्णय घेतला जाईल.
- आमदार हसन मुश्रीफ
राष्ट्रवादी कॉँग्रेसबरोबर अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांना अर्ज दाखल करण्यास सांगितलेले आहेत. राष्ट्रवादीकडून प्रस्ताव आल्यास विचार करण्यास हरकत नाही.
- पी. एन. पाटील
(जिल्हाध्यक्ष, कॉँग्रेस)
५राष्ट्रवादीकडून आघाडीत येण्याबाबत कोणताच प्रस्ताव आलेला नसल्याने आम्ही पॅनेलची तयारी केली आहे. येत्या तीन-चार दिवसांत चित्र स्पष्ट करू.
- संपतराव पवार
(माजी आमदार)