Kolhapur: नुकसान शत्रूकडून नव्हे, मित्रत्व दाखवणाऱ्यांकडून; मंडलिक समर्थकांच्या स्टेटसनी नव्या वादाला तोंड
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2024 01:09 PM2024-06-06T13:09:57+5:302024-06-06T13:10:32+5:30
'वेळ येईल तेव्हा दगाबाजी करणाऱ्यांना झेपणार नाही'
कोल्हापूर : कोल्हापूर लाेकसभा मतदारसंघातील तीन विधानसभा मतदारसंघातील विद्यमान लोकप्रतिनिधी, दोन साखर कारखान्यांचे सर्वेसर्वा, भाजपचे प्रमुख पदाधिकारी ही सारी झाडून यंत्रणा राबूनही महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांना विश्वास असणाऱ्याच विधानसभा मतदारसंघांनी झटका दिल्याने मंडलिक समर्थकांच्या मनात दगाफटक्याची पाल चुकचुकू लागली आहे.
त्यामुळे 'नुकसान शत्रुओ से नहीं हे, मित्रत्व का दिखावा करने वालों से है...' अशा स्टेटसमधून मंडलिक समर्थकांनी महायुतीमधीच 'सूर्याजी पिसाळ'चा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. निकालाच्या दुसऱ्याच दिवशी मंडलिक समर्थकांमधून सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त झालेली ही खदखद नव्या वादाला तोंड फोडणारी ठरणार आहे.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात स्वत:चे हाेमपिच असलेल्या कागल विधानसभा मतदारसंघात लाखापेक्षा जास्त मताधिक्य मिळेल, असा विश्वास खुद्द मंडलिक यांनीच बोलून दाखविला होता. राष्ट्रवादीचे आमदार वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, शाहू ग्रूपचे अध्यक्ष समरजित घाटगे या दोन्ही गटांचे बळ मंडलिक यांच्यामागे होते. मुश्रीफ यांनी तर 'हाडाची काडं अन रक्ताचं पाणी करून मंडलिक यांना निवडून आणण्याचे आदेशच' आपल्या कार्यकर्त्यांना दिले होते. मुश्रीफ, घाटगे अन मंडलिक हे तिन्ही गट कागलमध्ये पहिल्यांदाच एकत्रित आल्याने महायुतीच्या उमेदवाराचे लीड किती असेल याचीच उत्सुकता होती. मात्र, या विधानसभा मतदारसंघात चौदा हजारांपेक्षा अधिक मताधिक्य न मिळाल्याने मंडलिक समर्थकांची घोर निराशा झाली.
चंदगडमध्येही आमदार राजेश पाटील, माजी मंत्री भरमूण्णा पाटील सोबत असताना विरोधकांना मताधिक्य मिळाले. त्यामुळे आपल्याला कुणी दगाफटका केला यावरून आता घमासान रंगले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून हे द्वंद बाहेर पडत आहे. 'समोरच्याला आपण जेव्हा वरचढ वाटतो तेव्हा वार हे पाठीमागूनच होतात' अशा पोस्टनी मंडलिक समर्थक आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करून देत आहेत.
वेळ येईल तेव्हा दगाबाजी करणाऱ्यांना झेपणार नाही
'असे जय पराजय खूप झेललेत, आम्ही पेलून नेऊ...वेळ येईल तेव्हा दगाबाजी करणाऱ्यांना नक्कीच झेपणार नाही' अशा स्टेटसमधून इशाराही दिला जात आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर समर्थकांच्या स्टेटसमुळे दगाबाजी करणारा महायुतीचा नेता कोण? याचीच चर्चा रंगू लागली आहे.
..सांगा कुणी केला घात
या लोकसभा निवडणुकीत माजी आमदार के. पी. पाटील हे महायुतीचा धर्म पाळत मंडलिक यांच्यासाठी राबले. मात्र, त्यांच्या बहुतांश समर्थकांनी बिद्री कारखाना निवडणुकीत मंडलिक यांनी केलेला विरोध लक्षात ठेवत यंदा आमचं ठरलंय म्हणत शाहू छत्रपती यांनाच साथ दिल्याचे मताधिक्क्यावरून दिसते. के. पी. समर्थकांच्या या भूमिकेवरही आता आबिटकरांच्या कार्यकर्त्यांकडून टीकेची झोड उठवली जात आहे. 'मांडीला मांडी अन् खांद्यावर हात, याला राजकारण नाही, म्हणायचा घात' अशा पोस्ट व्हायरल केल्या जात आहेत.