Kolhapur Lok Sabha Election Result 2024: निवडणूक खर्चात संजय मंडलिक, धैर्यशील मानेच पुढे; किती केला खर्च.. जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2024 12:30 PM2024-05-11T12:30:25+5:302024-05-11T12:30:38+5:30
Kolhapur Lok Sabha Election Result 2024 : शाहू छत्रपती, राजू शेट्टी दुसऱ्या नंबरवर
Kolhapur Lok Sabha Election Result 2024 कोल्हापूर : कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा निवडणुकीसाठी केलेल्या खर्चात तिसऱ्या पडताळणीत महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक व धैर्यशील माने हे आघाडीवर राहिले आहेत. मंडलिक यांनी प्रचारावर ४ मे पर्यंत ६९ लाख ९२ हजार ०३२ रुपये तर माने यांनी ७५ लाख २६ हजार ९३५ रुपये खर्च केले आहे. शाहू छत्रपती व राजू शेट्टी दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
कोल्हापूर लोकसभेसाठी महायुतीकडून संजय मंडलिक व महाविकास आघाडीकडून शाहू छत्रपती या प्रमुख दोन उमेदवारांसह २३ जणांनी निवडणूक लढविली. अन्य उमेदवार वेगवेगळ्या पक्षाचे व अपक्ष असून त्यांनी सादर केलेला खर्च जास्तीत जास्त एक लाखापर्यंत आहे.
उमेदवारांनी प्रचारासाठी केलेल्या खर्चाच्या पडताळणीसाठी कोल्हापूर व हातकणंगले या दोन्ही मतदारसंघांसाठी स्वतंत्र निवडणूक खर्च निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी ३ व ४ मेपर्यंत तीनवेळा उमेदवारांनी सादर केलेल्या खर्चाची पडताळणी केली.
मंडलिक यांना ३० लाखांचा खर्च अमान्य
संजय मंडलिक यांनी आपल्या प्रचारावर झालेल्या एकूण खर्चापैकी ३० लाख ८६ हजार ०८६ रुपये इतका खर्च अमान्य केला आहे. तर शाहू छत्रपती यांनीदेखील ९ लाख १२ हजार ८०० रुपये हा खर्च अमान्य केला आहे.
अंतिम आकडा ४ जूननंतरच
वरील आकडेवारी ही अंतिम पडताळणीची असली तरी ४ जूननंतर एक महिन्याने उमेदवारांना खर्च सादर करण्याची मुभा आहे. निवडणूक निरीक्षकांनी दाखवलेले काही खर्च उमेदवारांना अमान्य असतात. मतमोजणी दिवशीदेखील उमदेवारांकडून खर्च केला जातो, विजयी मिरवणूक निघते. तो खर्चदेखील निवडणूक खर्चात धरला जातो.
कोल्हापूर मतदारसंघ
उमेदवार : खर्च
- संजय मंडलिक : ६९ लाख ९२ हजार ०३२ रुपये
- शाहू छत्रपतींनी ५९ लाख ९८ हजार ९६१ रुपये
हातकणंगले मतदारसंघ
- धैर्यशील माने - ७५ लाख २६ हजार ९३५
- राजू शेट्टी : ४४ लाख ८६ हजार ९३६
- सत्यजित पाटील-सरूडकर : ३५ लाख ०९ हजार ६९६