शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करण्याची पूर्तता करा, राजू शेट्टींची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 13:33 IST2024-12-27T13:31:40+5:302024-12-27T13:33:00+5:30

सर्व जिल्हाधिकाऱ्यांना १ जानेवारीला निवेदन देणार

Mahayuti government should fulfill the promise of seven day cleanup of farmers Raju Shetty demand | शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करण्याची पूर्तता करा, राजू शेट्टींची मागणी

शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करण्याची पूर्तता करा, राजू शेट्टींची मागणी

जयसिंगपूर (जि. कोल्हापूर) : विधानसभेच्या निवडणुकीत महायुती सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. त्याची पूर्तता राज्य सरकारने तातडीने करावी. दिलेला शब्द पूर्ण करावा. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून द्यावा, त्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने १ जानेवारी रोजी निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिली.

राजू शेट्टी म्हणाले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची पुणे येथे २५ डिसेंबर रोजी बैठक झाली. या बैठकीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. मागील पाच वर्षांत केंद्र सरकारच्या धोरणामुळे शेतकरी रसातळाला गेला आहे. त्यातच सोयाबीन, कापूस, तूर, दूध, साखर, डाळी, आदींच्या पडलेल्या दरामुळे शेतकरी मातीमोल झालेला आहे. उत्पादन खर्चापेक्षा कमी किमतीत शेतकऱ्यांना आपला शेतीमाल विकावा लागत आहे. रासायनिक खतांच्या किमतीत भरमसाट वाढ झालेली आहे. डी.ए.पी.मध्ये पुन्हा २५० रुपयांची वाढ झालेली आहे. कीटकनाशके, तणनाशकांच्या किमतीत मोठी वाढ झालेली आहे. सरकार हमीभाव जाहीर करते; पण हमीभावाचा कायदा अस्तित्वात नसल्याने शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी किमतीत शेतीमाल विकावा लागत आहे. 

परिणामी गेल्या पाच वर्षांत शेतकऱ्यांचे कर्ज हे दुप्पट झालेले आहे. एका बाजूला केंद्र सरकार देशातील काॅर्पोरट कंपन्यांच्या १० लाख कोटींच्या कर्जाचा निर्णय घेत नाही. ते कर्ज राईट ऑफ करत आहे. दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांचे कर्ज दुप्पट होते. ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. महायुती सरकारला शेतकऱ्यांनी भरभरून मते दिलेली आहेत.

राज्यात रामराज्य आले असल्याचे महायुतीचे नेते सांगत आहेत. राज्य सरकारने आपला दिलेला शब्द पाळावा, म्हणून राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, शेतकरी १ जानेवारीला जाऊन सरकारने दिलेल्या शब्दांची आठवण करून देतील. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मी स्वतः याबाबत आठवण करून देणार आहे. त्यानंतरही सरकारने आमची दखल घेतली नाही तर राज्यव्यापी मोठ्या आंदोलनाची घोषणा केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

Web Title: Mahayuti government should fulfill the promise of seven day cleanup of farmers Raju Shetty demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.