Gram Panchayat Election Result: कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीची सरशी
By समीर देशपांडे | Published: November 6, 2023 07:27 PM2023-11-06T19:27:00+5:302023-11-06T19:27:20+5:30
कोल्हापूर : जिल्ह्यातील ७४ ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीत राज्यात सत्तेवर असलेल्या महायुतीने बाजी मारली असून, ४२ ग्रामपंचायतींवर सत्ता प्रस्थापित केली ...
कोल्हापूर : जिल्ह्यातील ७४ ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीत राज्यात सत्तेवर असलेल्या महायुतीने बाजी मारली असून, ४२ ग्रामपंचायतींवर सत्ता प्रस्थापित केली आहे. त्याखालोखाल १८ ग्रामपंचायतींमध्ये स्थानिक आघाड्यांना पसंती मिळाली असून, १४ ठिकाणी महाविकास आघाडी सत्तेवर आली आहे.
जिल्ह्यातील ८९ ग्रामपंचायतींची निवडणूक झाली. यातील १५ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. उर्वरित ७४ ग्रामपंचायतींसाठी रविवारी ईर्षेने ८५ टक्के मतदान झाले. सकाळी ९ पासून प्रत्येक तालुक्याला सोमवारी मतमोजणी झाली. दुपारी १२ वाजेपर्यंत ही सर्व प्रक्रिया पार पडली. शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये पडलेल्या फुटीमुळे अनेक ठिकाणी चित्रविचित्र आघाड्या गावपातळीवर झाल्या होत्या. त्यामुळे अंदाज वर्तवणेही कठीण बनले.
विशेष म्हणजे करवीर तालुक्यातील चिंचवाड येथे महाडिक गट आणि आमदार सतेज पाटील गटाने युती करून उभ्या केलेल्या आघाडीचा ग्रामस्थांनी धुव्वा उडवला असून, अपक्षांनी बाजी मारली आहे. मतदारांना गृहीत धरू नका असाच संदेश यातून दिला आहे. गारगोटीसारख्या तालुकास्तरीय ग्रामपंचायतीमध्ये अजित पवार गटाचे माजी आमदार के. पी. पाटील आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांच्या गटाचे सरपंच निवडून आले असून, बहुमत मात्र आमदार प्रकाश आबिटकर गटाचे राहिले आहे.
पन्हाळा तालुक्यातील १४ पैकी ६ ठिकाणी जनसुराज्य आणि एक ठिकाणी नरके गटाने विजय मिळवला असून, स्थानिक आघाड्यांनी पाच, तर आमदार पी. एन. पाटील गटाने दोन ठिकाणी विजय मिळवला आहे. शाहूवाडी तालुक्यात सात ठिकाणी महायुती सत्तेवर आली असून, ३ ठिकाणी महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. महायुतीच्या सातपैकी ३ ठिकाणी जनसुराज्यची सत्ता आली आहे. महत्त्वाच्या बाजारभोगाव ग्रामपंचायतीत हिर्डेकर भावकीला प्रथमच सत्ता मिळाली आहे.
आजरा तालुक्यात चार ठिकाणी महायुती, तर तीन ठिकाणी महाविकास आघाडी व दोन ठिकाणी स्थानिक आघाडी सत्तेवर आली. राधानगरी तालुक्यात महायुतीला तीन, महाविकास आघाडीला दोन, तर स्थानिक आघाड्यांना चार ठिकाणी यश मिळाले. भुदरगड तालुक्यातील निवडणूक लागलेल्या चारही ग्रामपंचायतींवर महायुतीची सत्ता आली आहे.
करवीर तालुक्यातील आठपैकी सात ठिकाणी स्थानिक आघाड्या सत्तेवर आल्या असून, सांगवडेवाडी येथील ग्रामपंचायत सतेज पाटील गटाकडे आली आहे. गडहिंग्लज तालुक्यातील एकमेव अर्जुनवाडीची सत्ता अजित पवार गटाचे आमदार राजेश पाटील यांच्या गटाकडे राहिली. चंदगड तालुक्यातील १९ पैकी १६ ठिकाणी महायुतीची सत्ता आली असून, तीन ठिकाणी महाविकास आघाडीला यश मिळाले.
निवडणुका झालेल्या तालुकावार ग्रामपंचायती आणि विजयी आघाड्या
तालुका -ग्रामपंचायती -महाविकास आघाडी- महायुती -स्थानिक आघाड्या
चंदगड १९/३/१६/००
पन्हाळा १४/२/७/५
शाहूवाडी १/३/७/००
आजरा ९/३/४/२
राधानगरी ९/२/३/४
करवीर ८/१/००/७
भुदरगड ०४/००/४/००
गडहिंग्लज ०१/००/१/००
नेत्यांच्या गावात हे घडलं
गारगोटी : राहुल देसाई, के. पी. पाटील गटाचे सरपंच विजयी, तर आबिटकरांकडे बहुमत
वेळवट्टी : केडीसीसीचे संचालक सुधीर देसाई यांच्या गावात अजित पवार गटाची सत्ता
शिरोली दुमाला : गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील यांचे चिरंजीव सचिन पाटील लोकनियुक्त सरपंच.
सरवडे : विजयसिंह मोरेंचे चिरंजीव रणधीर बनले लोकनियुक्त सरपंच
सुपात्रे : मानसिंग गायकवाड यांची आघाडी सत्तेत
पालकरवाडी : माजी आमदार नामदेवराव भोईटे यांचे चिरंजीव महेश लोकनियुक्त सरपंच
कसबा वाळवे : उमेश भोईटे यांच्या गटाचा पराभव, भरत पाटील, अशोक फराकटे यांची सरशी
बाजारभोगाव : स्थापनेपासून हिर्डेकर भावकीला प्रथमच सरपंचपद, काँग्रेसच्या सीमा नितीन हिर्डेकर यांना संधी