महेश जाधव यांच्यासह पाचजणांची फिल्डिंग

By admin | Published: November 2, 2014 11:51 PM2014-11-02T23:51:24+5:302014-11-02T23:53:07+5:30

‘देवस्थान’ अध्यक्षपद : चंद्रकांतदादा पाटील यांची भूमिका ठरणार निर्णायक

Mahesh Jadhav and five people fielding | महेश जाधव यांच्यासह पाचजणांची फिल्डिंग

महेश जाधव यांच्यासह पाचजणांची फिल्डिंग

Next

सचिन भोसले-कोल्हापूर -पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अध्यक्षपदावर भाजपचे महानगर अध्यक्ष महेश जाधव यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. आघाडी सरकारच्या काळात हे पद गेले दीड वर्ष रिक्त होते. त्यावर कुणाची नेमणूक करायची यावर काँग्रेसमध्ये एकमत झाले नाही. नवीन सरकार आल्याने येत्या सहा महिन्यांत सर्वच रिक्त महामंडळांवरील नियुक्त्या भाजपच्यावतीने केल्या जाणार आहेत.
देवस्थान समितीवरील रिक्त जागांवर संगीता खाडे व बी. एन. पाटील-मुगळीकर यांची नियुक्ती राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. मात्र, ज्या पक्षाचा मुख्यमंत्री, त्या पक्षाकडे समितीचे अध्यक्षपद, त्यानुसार अध्यक्षपदाचा दावेदार म्हणून काँग्रेसकडे पाहिले जात होते. मात्र, या पदावर इच्छुक असणारे संजय डी. पाटील, माजी अध्यक्ष गुलाबराव घोरपडे, सुरेश कुराडे यांची नावे चर्चेत होती; पण मुख्यमंत्र्यांना जिल्हा काँग्रेस अध्यक्ष पी. एन. पाटील यांना हे पद द्यावयाचे होते. मात्र, मी इच्छुक नसल्याचे सांगत पी. एन. यांनी पद घेण्यास नकार दिला. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हे पद कुणाकडे द्यावे, या कारणाने या पदावरची नियुक्तीच रखडली.
आता राज्यात भाजपचे सरकार आल्याने जिल्ह्यातून या अध्यक्षपदासाठी भाजप महानगर अध्यक्ष महेश जाधव यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. जाधव हे नूतन पणन, सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे खंदे कार्यकर्ते मानले जातात. त्याचबरोबर शहर मतदारसंघातून नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पडलेल्या मतांचा विचार करता, त्यांचे राजकीय पुनर्वसन करणे पक्षाच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जात आहे.
यापूर्वी काँग्रेसकडे राज्यातील कोल्हापूरचे देवस्थान व शिर्डी साईबाबा संस्थानचे अध्यक्षपद आहे, तर राष्ट्रवादीकडे पंढरपूर व मुंबईतील सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्षपद होते. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीकडे कोल्हापूरसह सांगली, सातारा, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील ३६०० मंदिरांचे व्यवस्थापन येते. देवस्थानच्या जमिनी प्रचंड आहेत. उलाढालही कोट्यवधी रुपयांची आहे. त्यामुळे इतके महत्त्वाचे पद असतानाही त्याकडे पी. एन. पाटील यांनी पाठ फिरवली. पाच वर्षे त्यांना या पदाचा उपयोग झाला असता.
हा अलिखित संकेत
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचा व्याप मोठा आहे. त्यामध्ये ३६०० मंदिरांचे व्यवस्थापन, ५ ते १० हजार एकर जमीन आणि न्यायालयात सुरू असलेले प्रलंबित दावे यांच्याबद्दल सखोल ज्ञान असलेली व्यक्तीच अध्यक्षपदी विराजमान व्हावी. याकरिता कायद्याचा पदवीधर अथवा माहीतगार असणे आवश्यक आहे, असा अलिखित संकेत आहे.

यांच्याही नावाची चर्चा
या समितीच्या अध्यक्षपदासाठी नगरसेवक प्रा. जयंत पाटील यांच्या नावाचा आग्रह आमदार महादेवराव महाडिक हे धरू शकतात. कारण राष्ट्रवादी व काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजप आमदार निवडून आणण्यात त्यांनी सिंहाचा वाटा उचलला आहे. याचबरोबर शहरातून विधानसभेसाठी नगरसेवक आर. डी. पाटील यांनी महेश जाधव यांच्यासाठी माघार घेतली. त्यामुळे त्यांचेही राजकीय पुनर्वसन होऊ शकते. त्याचबरोबर भाजपचे निष्ठावंत म्हणून अ‍ॅड. संपत पवार, तर हिंदुत्ववादी कार्यकर्ते अशोक देसाई तसेच भाजपमध्ये नव्याने आपल्या गटासह दाखल झालेले माजी मंत्री दिग्विजय खानविलकर यांचे सुपुत्र विश्वविजय खानविलकर यांच्याही नावाची चर्चा आहे.

Web Title: Mahesh Jadhav and five people fielding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.