नवरात्रौत्सवात नवमीला व्हीआयपी दर्शन बंद- महेश जाधव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 11:09 AM2019-09-17T11:09:20+5:302019-09-17T11:11:34+5:30
करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या शारदीय नवरात्रोत्सवात नवमीला (७ आॅक्टोबर) देवीचे व्हीआयपी दर्शन बंद राहील, अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी दिली. दरम्यान, उत्सवाच्या तयारीसाठी श्रीपूजक, महापालिका, महावितरण, पोलीस प्रशासन, स्वयंसेवी संस्थांची प्राथमिक बैठक पार पडली.
कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या शारदीय नवरात्रोत्सवात नवमीला (७ आॅक्टोबर) देवीचे व्हीआयपी दर्शन बंद राहील, अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी दिली. दरम्यान, उत्सवाच्या तयारीसाठी श्रीपूजक, महापालिका, महावितरण, पोलीस प्रशासन, स्वयंसेवी संस्थांची प्राथमिक बैठक पार पडली.
समितीच्या त्र्यंबोली येथील कार्यालयात झालेल्या बैठकीस कोषाध्यक्ष वैशाली क्षीरसागर, सचिव विजय पोवार, सहसचिव एस. एस. साळवी, सदस्य शिवाजी जाधव, राजू जाधव उपस्थित होते. येत्या २९ तारखेपासून शारदीय नवरात्रौत्सवाला प्रारंभ होत आहे. यानिमित्त देवस्थान समितीच्या वतीने तयारी सुरू करण्यात आली आहे.
नवरात्रौत्सवात नऊ दिवस सर्वांनाच रांगेतून वेळेत दर्शन मिळावे; यासाठी देवस्थान समिती प्रयत्नशील असते; पण या नऊ दिवसांत राज्यभरातून आमदार, खासदार, मंत्री असे व्हीआयपी लोक दर्शनासाठी येतात. एरवी अष्टमीच्या दिवशी व्हीआयपी दर्शन बंद ठेवले जाते; मात्र यंदा नवमीला म्हणजेच ७ आॅक्टोबरला सोमवार असल्याने व्हीआयपी दर्शन दिले जाणार नाही, असा निर्णय समितीने घेतला आहे.
पुढील आठवड्यात मंदिराच्या स्वच्छतेला, तसेच मंदिराच्या शिखरांना रंगरंगोटी करण्यात येणार आहे. यंदा विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भाविकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे; त्यामुळे भाविकांना वेळेत देवीचे दर्शन मिळावे, यासाठी देवस्थान कर्मचारी व एनजीओ कार्य करतील.
पोलीस प्रशासन आणि देवस्थान समितीच्या सीसीटीव्ही यंत्रणेमार्फत चोख सुरक्षा ठेवली जाणार आहे. पाणी, स्वच्छतागृह, प्राथमिक आरोग्य केंद्र, पार्किंगची ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत.
मणकर्णिका खुले करण्यासाठी पुरातत्वची परवानगी
मंदिर परिसरातील मणकर्णिका कुंड पूर्ववत खुले करण्यासाठी पुरातत्व खात्याने देवस्थान समितीला परवानगी दिली आहे. डेक्कन इन्स्टिट्यूटचे अधिकारी व विद्यार्थ्यांकडे हे काम सोपविण्यात येणार आहे. ही जागा समितीच्या मालकीची असून, ती परत मिळावी यासाठी महापालिकेकडे पाठपुरावा केला आहे. जागा रितसर परत मिळाली, की कुंड खुले करण्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.
दर्शन मंडपाचे काम समिती करेल ...
तीर्थक्षेत्र आराखड्यासाठी शासनाकडून निधी येऊन दोन महिने लोटले, तरी महापालिकेकडून काहीच काम झालेले नाही. त्यांना अंबाबाई मंदिराबद्दल गांभीर्यच नसल्याचे दिसून आले आहे. दर्शन मंडपासाठी पर्यायी जागा, पार्किंगची ठिकाणे ठरली आहेत, डिझाईन झाले तरी निविदा काढण्यात आलेली नाही. महापालिकेला दर्शन मंडप करणे जमणार नसेल, तर त्यांनी जागा आणि सर्वाधिकार देवस्थानला द्यावेत, आम्ही दर्शन मंडप उभारू, असेही जाधव म्हणाले.